महेश कुलकर्णी
सोलापूर : मायक्रोसॉफ्टच्या वतीने शिक्षण पद्धतीत नावीन्यपूर्ण अध्यापन करणाºया शिक्षकांना दिला जाणारा ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट’ पुरस्कारावर झेडपीच्या शिक्षकांनी नाव कोरले आहे. माढा तालुक्यातील परितेवाडी जि.प. शाळेत काम करणारे शिक्षक रणजितसिंह डिसले आणि नांदेड जिल्ह्यातील सुनील अळूरकर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
वर्ग अध्यापनात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शिक्षण पद्धतीला वेगळा आयाम देणाºया शिक्षकांना हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. जगभरातून ७ हजार ६०० शिक्षकांनी यासाठी अर्ज केला होता. भारतात ४५६ जणांना अशा प्रकारचे पुरस्कार देण्यात आले आहेत. तर महाराष्टÑात केवळ दोन शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
रणजितसिंह डिसले यांनी ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप’(आभासी सहल) या अभिनव प्रयोगाद्वारे जगभरातील ५४ हून अधिक देशांतील ८०० पेक्षा अधिक शाळांमधील मुलांना वैज्ञानिक संकल्पनाचे धडे दिले आहेत. त्यांनी शैक्षणिक पुस्तकांसाठी विकसित केलेली क्यूआर कोड प्रणाली महाराष्टÑातील सर्व शालेय पुस्तकांमध्ये वापरली जाते.
२०१९ पासून ही प्रणाली पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण देशभरात लागू करणार येणार आहे. क्यूआर कोडेड पाठ्यपुस्तकांचा प्रयोग केवळ महाराष्टÑापुरता मर्यादित राहिला नसून १२ देशात शाळांमध्ये हा राबवला जाण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. यात अमेरिका, कोरिया, हाँगकाँग, इजिप्त, जपान, इंडोनेशिया, फिनलँड, व्हिएतनाम, आॅस्ट्रिया, नेदरलँड, केनिया व नायजेरिया यांचा समावेश आहे. डिसले यांच्या नावावर १२ शैक्षणिक साधनांची पेटंट्स आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगल, प्लीकेर्स, ब्रिटिश कौन्सिल यासारख्या नामांकित कंपन्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. त्यांना हा बहुमान चौथ्यांदा मिळाला आहे.
दिल्लीत होणार गौरव- मायक्रोसॉफ्टने जाहीर केलेल्या या पुरस्कारांचे वितरण नवी दिल्ली येथे नोव्हेंबर महिन्यात होणार असून मायक्रोसॉफ्टच्या एज्युकेशनल हेड विनिश जोहरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. प्रमाणपत्र आणि मायक्रोसॉफ्टचे ५६ प्रकारे शैक्षणिक सॉफ्टवेअर (किंमत अंदाजे दीड लाख) निवड झालेल्या शिक्षकांना मोफत देण्यात येणार आहेत.
आॅनलाईन धडे !- सुनील अळूरकर हे नांदेड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मॅसिव्ह ओपन आॅनलाईन कोर्सच्या मदतीने त्यांनी झेडपी गुरुजी डॉट कॉम ही हे संकेतस्थळ बनविले आहे. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत एक लाखापेक्षा अधिक शिक्षकांना आॅनलाईन तंत्रज्ञानाचे धडे दिले आहेत. यापूर्वी त्यांना नॅशनल आयसीटी अॅवॉर्ड राष्टÑपतींच्या हस्ते मिळालेले आहे.