आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर : मोहन डावरेपंढरपूर आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रमुख संतांच्या पालख्या आज पंढरपूर तालुक्यात दाखल होत असल्याने भाविकांची संख्याही क्षणाक्षणाला वाढत आहे. शुक्रवारी पंढरपूर शहरात दोन हजार रुपयांची बनावट नोट आढळून आल्याने भाविक, व्यापारी व ग्राहकांसह प्रशासनामध्येही खळबळ उडाली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरात १० रुपयांचीही बनावट नाणी चलनात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे व्यापारी व ग्राहकांमध्ये वाद वाढला आहे. यामध्ये प्रशासनाने लक्ष घालून या प्रकारांना आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.पंढरपूर आषाढी यात्रा सोहळ्यासाठी देशभरातून तब्बल १० लाखांपेक्षा जास्त भाविक येत असतात. या एकगठ्ठा गर्दीचा फायदा घेत अनेक लहान-मोठ्या कंपन्या, खेळणी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, कपडे व्यावसायिक यांच्यासह अनेक लहान-मोठे व्यावसायिक आपल्या मालाची विक्री करण्यासाठी पंढरपूरला येतात. या गर्दीचा व बाहेरून येणाऱ्या व्यापारी भाविकांचा फायदा घेण्यासाठी दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा खपविणारी टोळीही पंढरपुरात दाखल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.शुक्रवारी स्टेट बॅँक परिसरातील काही दुकानांमध्ये दोन हजार रुपयांची बनावट नोट आढळून आली. त्या व्यावसायिकाने ती नोट बॅँकेत भरणा करण्यासाठी दिली असता ती नोट बनावट असल्याचे बॅँक प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर ती नोट त्या ग्राहकाला परत देण्यात आली. त्यामुळे तो ग्राहकही काहीकाळ चक्रावून गेला. त्यानंतर त्याने दुसरी दोन हजार रुपयांची नोट व बॅँकेने फेक नोट असल्याच्या कारणावरून परत केलेली नोट याची तुलना केली असता ती नोट बनावट असल्याचे स्पष्ट लक्षात आले.-------------------------------व्यापाऱ्यांमध्ये घबराटआषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. एकाचवेळी खरेदीसाठी गर्दी होत असल्याने व्यापारी, ग्राहकांकडून येणाऱ्या १०, २०, १००, ५००, २००० रुपयांच्या नोटा व ५, १० रुपयांची नाणी फारशी चेक करून घेतली जात नाहीत; मात्र यात्रा सोहळ्याअगोदर पंढरपुरात दोन हजार रुपये व १० रुपयांची बनावट नाणी आढळून आल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे वारीत व्यवसाय करताना ग्राहकांकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या नोटा व्यापाऱ्यांना खात्रीपूर्वक तपासूनच घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे ग्राहक, व्यापारी यांच्यात वाद-विवाद होणार हे निश्चित.--------------------------------प्रशासनाची डोकेदुखीआषाढी यात्रा कालावधीत एकगठ्ठा येणारे भाविक चोऱ्या-माऱ्या रोखणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग या ठिकाणी सेवा देताना पोलीस प्रशासनाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो; मात्र यावर्षी यात्रा सोहळ्याअगोदर दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने प्रशासनाची आणखी डोकेदुखी वाढली आहे. येत्या काही दिवसात हे प्रकार आणखी समोर आल्यास बनावट नाणी व नोटा खपविणाऱ्यांना शोधणे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.
पंढरीत आढळली दोन हजारांची बनावट नोट, भाविकांमध्ये खळबळ
By admin | Published: July 01, 2017 11:44 AM