कारवाईदरम्यान संतोष मधुकर चव्हाण व संजय बुधावले, सेवागिरी बाळासाहेब चव्हाण, काशिलिंग बाळासाहेब चव्हाण व बाळासाहेब धोंडिबा चव्हाण (रा. महिम, ता. सांगोला) हे पोलिसांना पाहून तेथून पळून गेले.
पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस हेडकॉन्स्टेबल नागनाथ क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल धुळा चोरमले हे पेट्रोलिंग करताना गोपनीय माहितीच्या आधारे महिम येथील संतोष चव्हाण हा संजय बुधावले यांच्या उसाच्या शेतात, तर बाळासाहेब चव्हाण यांच्या घराजवळील झुडपात सेवागिरी चव्हाण, काशिलिंग चव्हाण, बाळासाहेब चव्हाण हे पिता-पुत्र चोरून हातभट्टी चालवीत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तेथे धाड टाकून ८ लोखंडी व प्लास्टिक बँरेलमधील सुमारे ३६ हजार रुपयांचे २ हजार लिटर गुळमिश्रित रसायन जागेवर नष्ट केले. यावेळी २ हजार रुपयांची ५० लिटर तयार हातभट्टीच्या दारूसह ६ नवसागर कांड्या, २ किलो युरिया असा २०७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल धुळदेव चोरमले यांनी पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.