सोलापूर : व्हायब्रंट टेरी टॉवेलच्या माध्यमातून शहराचे नाव जगभर पोहोचविण्यासाठी सोलापूरकरांनी उन्हाचीही तमा बाळगली नाही. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत २ हजार ४९ लोक उभे राहात टॉवेलच्या साखळीने आपल्यातल्या एकतेचा प्रत्यय दिला. विश्वविक्रमाची नोंद करण्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विक्रमाच्या नोंदीचा निकाल आठ दिवसानंतर कळणार आहे.
प्रत्येकाने केलेला पांढºया रंगाचा पेहराव, हातामध्ये पांढºया रंगाचा टॉवेल, जागोजागी उभे राहून पाणी व नाष्टा पुरविणारे स्वयंसेवक, कानावर पडणाºया सूत्रसंचालकांच्या सूचना, मधूनच वाजविण्यात येणारे संगीत व ठेका धरायला लावणारी देशभक्तीपर गीते, उत्साह वाढवणाºया क विता व शायरी अशा वातावरणात लिंगराज वल्याळ मैदानावर मानवी साखळीचा उपक्रम घेण्यात आला. सर्वांच्या मनात एकच भावना होती ती म्हणजे सोलापूरच्या नावे विश्वविक्रम व्हावा.
शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून मैदानाकडे अनेकांची पाऊले जात होती. जसजसा वेळ पुढे जात होता तशी उन्हाची तीव्रता वाढत होती. घामाच्या धाराही येत होत्या; मात्र हार मानणार तो सोलापूरकर कसा या भावनेने तब्बल चार तास मैदानावर घालविले. मागील सात दिवसांपासून स्वयंसेवक या उपक्रमाची तयारी करत होते. मैदानावर थांबलेल्या सोलापूरकरांची स्वयंसेवकांनी काळजी घेतली. गिनीज बुकच्या नियमानुसार कशा पद्धतीने थांबावे, व्हिडीओच्या माध्यमातून गणना होत असताना काय करावे अशा सूचना स्वयंसेवकांनी दिल्या. मानवी साखळीत सहभागी झालेल्यांचा उत्साह वाढविण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. चहा-पाण्याची व्यवस्था करण्यापासून भोवळ आलेल्यांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. उपक्रमाची निर्धारित वेळ पूर्ण झाल्यानंतर मैदानावर त्यांनी जल्लोष केला.
प्रत्येक सहभागींच्या हातावर एक बँड बांधण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येकाला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला होता. मैदानात पावसाचे पाणी, चिखल असूनही नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. महापौर शोभा बनशेट्टी, नगरसेविका रामेश्वरी बिर्रु, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बाळासाहेब यशवंते, टीडीएफचे अध्यक्ष राजेश गोसकी यांची या उपक्रमाला उपस्थिती होती.
सध्या इटलीच्या नावे विक्रम- २०१५ मध्ये इटलीमध्ये लोंगेस्ट ह्यूमन टॉवेल चेनचा विश्वविक्रम करण्यात आला होता. या विक्रमात एक हजार ६४६ माणसांनी टॉवेल पकडून मानवी साखळी केली होती. सोलापूर हे टेरी टॉवेल उत्पादनात सुप्रसिद्ध आहे. जागतिक स्तरावर याची नोंद व्हावी यासाठी अगोदरच्या रेकॉर्डपेक्षा अधिक फरकाने टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन आयोजित तीन हजार माणसांची टॉवेल साखळी करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परीक्षणासाठी ड्रोन कॅमेºयाचा वापर करण्यात आला. या उपक्रमात २ हजार ४९ लोक सहभागी झाल्याने हा विक्रम मोडेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.