वैराग : बार्शी तालुक्यात गौडगाव येथे गावाच्या उत्तरेला कात्री रोडवर वाडी (गावठाण) परिसरात दोन हजार वर्षांपूर्वीच्या पुरातन वस्तू सापडल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. पुरातत्व विभागाने येथे उत्खनन करून संशोधन करावे, अशी मागणी राहुल भड यांनी केली आहे.
इतिहास व पुरातत्व अभ्यासक महेश दसवंत यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी केली असता त्यांना तेथे काही अवशेष मिळाले. त्यामध्ये मृद सातवाहन काळातील मृद्-भांडचे भग्नावस्थेतीस लाल रंगाचे काही तुकडे प्राप्त झाले. त्याचबरोबर आंध्राकिसक्रॉस वियर हे प्रसिद्ध मृद्-भांड मिळून आले आहे.
प्राचीन काळी नदीला पूर येणे, भूकंप, परकीय आक्रमण, आग, वणवा किंवा एखादा जीवघेणा रोग, अशी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास मानवसमाज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गाव, वसाहत निर्माण करत असे. अशाच प्रकारे अनेक वर्षांपूर्वी अर्थात सध्याचे गौडगाव हे गावठाण या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वसलेले आहे.
या परिसरात मोठे शिवलिंग आणि एक गणेशमूर्ती आहे. शिवलिंगावरून गावामध्ये तत्कालीन काळामध्ये शिवमंदिर असावे. तशा स्वरूपातील मंदिराचे काही अवशेषही आढळून येतात. हे मंदिर उत्तर चालुक्यकालीन असावे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
आंध्राकिसक्रॉस वियर हे सातवाहन कालखंडाशी संलग्नित दिसून येत आहे. या ठिकाणी सुपारीच्या आकाराचा भाजलेल्या मातीचा मणी मिळाला. त्याचबरोबर निळ्या रंगाचा मणीही प्राप्त झाला आहे, तसेच प्राचीन काळातील शंखापासून बनवलेल्या भग्नावस्थेतील बांगड्या, छोट्या आकाराचे कॅल्सिडोनीपासून बनवलेले ब्लेज प्राप्त झाले. कार्लेनियन, ॲगेट आणि हिरव्या आकाराचे मौल्यवान दगड, बहामनी कालखंडातील तांब्याचे नाणे, दोन्ही बाजूंनी सपाट असलेली नाणी प्राप्त झाली आहेत.
----
दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू सापडल्याने गौडगाव परिसरातून कुतूहल व्यक्त होत आहे.
सध्या या भागावर शेती केली जाते. या ठिकाणी हाडांचे अवशेष बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. मिळालेल्या अवशेषांवरून याचा कालखंड हा सातवाहन काळापर्यंत जातो. त्यामुळे पुरातत्व विभागाकडून अभ्यासासाठी इथे उत्खनन करावे
-राहुल भड,
सामाजिक कार्यकर्ते
----
प्राचीन मंदिर, वीरगळ अन् अलंकार
सध्या गावात १५० वर्षांपूर्वीचे वाडे पाहायला मिळतात. हनुमान मंदिर आणि यमाईदेवी मंदिराजवळ काही प्राचीन वीरगळ आणि प्राचीन मंदिराचे अवशेष आढळून आले आहेत. हनुमान मंदिराच्या गाभाऱ्यात उत्तर चालुक्यकालीन विष्णूमूर्ती असून, मूर्तीच्या हाती पद्म, शंख, चक्र, गदा ही आयुधे आहेत. याचबरोबर डोक्यावर मुकुट, कानात कर्णकुंडले, दंडात केयूर, हातात कंकण, गळ्यामध्ये ग्रिविका एकावली माळा, पायात तोडे, नूपुर अशा प्रकारचे विविध प्राचीन अलंकार दिसून आले आहेत.
----
फोटो : १९ वैराग
गौडगाव येथे सापडलेल्या प्राचीन वस्तू.