मोहोळ : भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना २२ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास देवडी गावच्या हद्दीत घडली.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोडनिंब येथे सावळेश्वर टोल नाक्याकडून महामार्गाचे काम सुरू आहे. त्या कामावरील जेसीबी चालक बसवेश्वर महादेव वाघचवरे (वय ३२, रा. सारोळे, ता. मोहोळ) व त्याच्यासोबत ट्रॅक्टरवर चालक असणारा मारुती एकनाथ करंडे (वय ४५, रा. सारोळे, ता. मोहोळ) हे दोघे नेहमीप्रमाणे सायंकाळी काम संपवून दुचाकीने (एमएच १३ सीए ८६४५) मोडनिंबमार्गे मोहोळकडे येत होते. देवडी गावच्या हद्दीत पुणे ते मोहोळ जाणाऱ्या महामार्गावर पाठीमागून आलेल्या मालट्रकने (एमएच १२ आरएन १६९१) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील बसवेश्वर वाघचवरे याच्या अंगावरून मालट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला मारुती करंडे हा गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात योगेश वाघमारे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास सहायक फौजदार गायकवाड करीत आहेत.