पंढरपूर : चार मित्र चंद्रभागा नदीमध्ये पोहायला गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यापैकी दोघेजण बुडाले. त्यांच्यापैकी एकाला सुखरूप बाहेर काढले असून दुसरा मात्र बेपत्ता आहे.
प्रथमेश कुलकर्णी (रा. सरकोली, ता. पंढरपूर ) असे पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून चंद्रभागा नदीच्या पुंडलिक मंदिराजवळ ही घटना घडली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, रविवारी दुपारी चारच्या सुमारास चंद्रभागा नदीवर चार मित्र पोहायला गेले होते. चारही जणांना बऱ्यापैकी पोहायला येत होते. मात्र त्यापैकी दोघांना नदीतील पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पाच वाजण्याच्या सुमारास दोघेजण पाण्यात बुडाले. दरम्यान, त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतर दोघांनी नदीपात्रातील कोळी बांधवांना याची माहिती दिली. नदीतिरावरील कोळी बांधवांनी लागलीच त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र प्रथमेश कुलकर्णी बुडाला असून तो नदीप्रवाहात बेपत्ता झाला. पोलीस मित्र आणि कमांडो म्हणून तो मंदिर समिती व पोलिसांकडे काम करीत आहे.
----
अन् शोध मोहीम थांबवली
दरम्यान, घटना समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सायंकाळपर्यंत नदीपात्रात पोलीस आणि कोळी बांधवांकडून त्याचा शोध सुरू होता. मात्र अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आल्याची माहिती पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.
----
फोटो : २० प्रथमेश कुलकर्णी