याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला ही घरी असताना एका दुचाकीवरून अनोळखी दोन इसम घरी आले. त्यांनी ‘आम्ही सेल्समन असून आम्ही सोन्या-चांदीचे दागिनेही ५ मिनिटांत पॉलिश करून देतो, असे सांगून त्यांनी गॅसवर भांड्यात पाणी उकळण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी महिलेने १ तोळ्याची सोन्याची चेन व जाऊ सुजाता हिच्याकडील अर्ध्या तोळ्याचे मंगळसूत्र घेऊन उकळत्या पाण्यात टाकून पाण्यात हळद टाकण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने ते पाणी पांढऱ्या दगडाने फिरवून झाकून ठेवण्यास सांगितले. दहा मिनिटांनी तुमचे सोने काढून बघा पॉलिश झालेले दिसेल, असे सांगून दोघेही दुचाकीवरून पसार झाले.
त्यानंतर संशय आल्याने महिलांनी त्यातील गरम पाणी ओतून देताच त्यात दागिने दिसले नाहीत. त्यामुळे त्यांनी दगड फिरवत असताना महिलेची नजर चुकवून दागिने काढून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले. आपण फसवलो गेल्याचे लक्षात येताच दोघींनी नातेवाइकांना बोलावून हा प्रकार सांगितला. शोधाशोध करूनही ते न मिळाल्याने पोलिसात तक्रार दिली. तपास फौजदार गणेश शिंदे करत आहेत.
----