पंढरपूर : विदेशातून पंढरपुरात आलेल्या २ वर्षाच्या लहान मुलाचा कोरोनाबाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे पंढरपुरात बाहेरून आलेल्या नागरिकांच्या माध्यमातून कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. तो राहत असलेला परिसर कंटेनमेंट झोन करण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
विदेशातून एक कुटुंब सोलापूर येथे आले होते. त्याठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच त्यांची कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्यानंतर ते कुटूंब पंढरपुरातील भक्ती मार्ग परिसरातील घनश्याम सोसायटीत राहण्यास आले होते.
त्या कुटूंबातील लहान मुलाचा शुक्रवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबातील हायरिस्क असलेल्या ४ सदस्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन तर लो रिस्क असलेल्या ३ सदस्यांना होमक्वॉरंटाईन करण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.