सोलापूर : पुणे महामार्गावरील मडकीवस्ती येथे बिल्डरकडून खोदण्यात आलेल्या चारीत ड्रेनेजची पाईपलाईन जोडत असताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने दबून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. अमर गणेश डांगे (वय २६, रा. कमलानगर, विजापूर रोड, सोलापूर) असे मरण पावलेल्या मजुराचे नाव आहे. सिद्धीशांभवी डेव्हलपर्सतर्फे मडकीवस्ती येथे सुरू असलेल्या बांधकामात ड्रेनेजचे काम करण्याचा ठेका सुनील पाटील, विजय चव्हाण यांनी घेतला होता. त्यांनी दहा फुटांची चारी खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. बुधवारी दुपारी एक वाजता अमर हा चारीत उतरून ड्रेनेज पाईप जोडत होता. यावेळी अचानकपणे बाजूच्या काळ्या मातीचा ढेपारा त्याच्या अंगावर कोसळला. ढिगार्याखाली तो दबला गेला. सोबत असलेला मजूर संदीप टिळे याने आरडाओरडा केल्यावर ठेकेदार पाटील, चव्हाण हे तेथे धावत आले. त्यांनी मातीचा ढिगारा बाजूला सारून बेशुद्धावस्थेत अमर याला उपचारास शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे डॉ. प्रदीप कदम यांनी घोषित केले. त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. आईवडिलांना तो एकुलता एक होता. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मातीच्या ढिगार्याखाली दबून मृत्यू ड्रेनेजची पाईपलाईन जोडताना घडला प्रकार
By admin | Published: May 07, 2014 8:35 PM