सोलापूर : महापालिका आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अतिक्रमण विभागाने चक्क बांधलेल्या शेळ्या पकडून आणल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख भालेराव यांच्या सूचनेनुसार पथकाने दोन दिवसांपूर्वी चक्क ३0 शेळ्या पकडून आणल्या. एका शेळीला दिवसा ६00 प्रमाणे १८ हजारांचा दंड केला. यामुळे शेळीमालक हवालदिल होऊन महापालिकेत दाखल झाला. त्याने सभागृहनेता संजय कोळी यांची भेट घेऊन कैफियत कथन केली. त्यावर कोळी यांनी अतिक्रमण पथकातील कर्मचाºयांना बोलावून घडल्याप्रकाराची खातरजमा केली.
शहरात मोकाट फिरणाºया जनावरांवर कारवाई करण्याचे आदेश आहेत. पथकाने चक्क बांधलेल्या शेळ्या पकडून आणल्याचे निष्पन्न झाले. असा प्रकार का केला याबाबत कोळी यांनी जाब विचारल्यावर उद्दिष्टपूर्तीसाठी दररोज कारवाया करणे गरजेचे असल्याचे सांगितले. उद्दिष्टपूर्तीसाठी जुळे सोलापुरात मोकाट जनावरांची मोठी संख्या असल्याचे निदर्शनाला आणल्यावर पथकातील कर्मचारी नरमले. आरोग्य विभागातील कर्मचाºयांनाही दररोज एक हजार दंड वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे उघड्यावर शौच करणारे, कचरा टाकणाºयावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
होम मैदानाचे काम होणार सुरू...- स्मार्ट सिटी योजनेतून २ कोटी ४५ लाख खर्चूून होम मैदानाचा विकास करण्यात येणार आहे. या कामाचे टेंडर गुरुवारी फायनल करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. त्याचबरोबर पासपोर्ट कार्यालयाजवळ नर्सरी उभी केली जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेला तीन वर्षे पूर्ण होत असल्याबाबत नवीन कामांचे भूमिपूजन करण्याचे नियोजन महापौर शोभा बनशेट्टी यांनी सुचविले आहे.