टाळेबंदीनंतर सामान्यांना आलेले भरमसाठ वीज बिल माफ करावे. वीज बिल थकबाकीपोटी सुरू असलेली वीज तोडणी त्वरित थांबवावी, या मागण्यांसाठी दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सांगोला येथील महावितरण कार्यालयासमोर आसूड मोर्चा काढण्यात आला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर, शशिकांत पाटील, अनिल केदार, भालचंद्र गोडसे, अक्षय विभुते, अजिंक्य तोडकरी, विशाल गोडसे, खंडू इंगोले, कृष्णदेव इंगोले, नागेश इंगोले, तेजस गांजले, शुभम काकडे यांच्यासह मनसैनिक, नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
ऊर्जामंत्र्यांच्या घोषणा फोल ठरल्या
कोरोनासारख्या टाळेबंदीच्या काळात सामान्यांना मोठ्या प्रमाणावर वीज बिले आली. यानंतर ऊर्जामंत्र्यांनी वीज बिल माफ करू. तीन टप्प्यांमध्ये वीज बिल भरण्याची सवलत देऊ, अशी घोषणा केली. मात्र ऊर्जामंत्र्यांची घोषणा फोल ठरली. त्यांनी महाराष्ट्राला फसवलं आहे. सध्या प्रत्यक्षात सामान्यांची वीज तोडणी होत आहे. त्यामुळे महावितरण जनसामान्यांच्या जीवावर उठत असेल तर वीज तोडणीसाठी येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मनसे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिलीप धोत्रे यांनी दिला.