सोलापूर : माढा तालुक्यातील वरवडे येथे उजनी ते सोलापूर जलवाहिनीच्या जोडणीचे बोल्ट काढून पाणी चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली असून पाणीपुरवठा विभागाच्या वतीने याप्रकरणी मोडनिंब पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आल्याची माहिती मनपाचे जलवितरण उपअभियंता एस.बी. धनशेट्टी यांनी दिली.
महापालिकेच्या उजनी ते सोलापूर जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागते. यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. महापालिकेने अमृत योजनेतून पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. काही दिवसांपूर्वी या जलवाहिनीला पाच ठिकाणी एक्स्पानशन जॉर्इंट बसविण्यात आले होते.
सोमवारी सकाळी वरवडेजवळ या जॉर्इंटचे सहा बोल्ट काढण्यात आले. गळती सुरू झाली. पाण्याचे फवारे सोलापूर-पुणे राष्टÑीय महामार्गावर आले. याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी वरवडे येथे दाखल झाले. यादरम्यान उजनी पंपगृहातून पाणीपुरवठा बंद करण्यात आले. मंगळवारी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत बहुतांश काम पूर्ण झाले होते. या ठिकाणी वेल्डींग करुन कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले. दुरुस्तीचे उर्वरित काम शटडाऊनच्या दरम्यान करण्यात येणार आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध मोडनिंब पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याचे उपअभियंता धनशेट्टी यांनी सांगितले.
दुष्काळात तेरावा- उजनीच्या पाईपलाईनवर दरोडा टाकून शेतीसाठी पाणी वापरल्याचे महापालिकेच्या अधिकाºयांनी यापूर्वीही उघडकीस आणले आहे. यामध्ये एका झेडपी सदस्याचाही समावेश होता. झेडपीच्या तत्कालीन अध्यक्षांनी हस्तक्षेप करुन या सदस्यावरील कारवाई रोखली होती. पाणी चोरणाºयांवर कडक कारवाई झाली नसल्याने यानंतरही हे प्रकार घडत असल्याचे पाणीपुरवठा विभागातील कर्मचाºयांचे म्हणणे आहे. उजनी ते सोलापूर पाईपलाईन १२ तास बंद राहिली तर सोलापूरचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत होतो. मागील आठवड्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. आता पाईपलाईनच्या जोडणीचे बोल्ट काढल्याचे कारण पुढे आले आहे.