बेंबळे: पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरणात पाणी येऊ लागले आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दिवसभरात दोन टक्के पाण्यात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होऊ लागल्या आहेत.संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने चांगली सुरुवात केली होती. परंतु उजनीच्या पाणलोट क्षेत्रात (नगर, पुणे, सोलापूर) पावसाने दडी मारल्याने उजनीतील पाणी दिवसेंदिवस घटत चालले होते. परंतु गेल्या दोन दिवसात उजनीच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम तर कोठे सरीवर सरी पडू लागल्याने भीमा नदीतून उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.बुधवारी सकाळपासून उजनीत ३९१७ क्युसेक्सने पाणी येऊ लागले. त्यात वाढ होऊन सायंकाळी सहा वाजता तोच विसर्ग ५९४० क्युसेक्स झाला. बंडगार्डन येथून १७४७२ क्युसेक्स पाणी येऊ लागले आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी उजनीत वजा २६.७३ पाणी असलेला साठा दोन टक्क्यांनी वाढून वजा २४.४५ झाला आहे. सध्या उजनीत एकूण पाणी पातळी ४८८.९६२ मीटर इतकी तर एकूण साठा १४३१.८३ दशलक्ष घनमीटर, उपयुक्त साठा वजा ३७०.९८ दशलक्ष घनमीटर तर टक्केवारी वजा २५.४५ टक्के इतकी आहे. बंडगार्डन येथील विसर्ग उजनीत येण्यास १२ तास लागत आहेत.
उजनीच्या साठ्यात २ टक्के वाढ
By admin | Published: July 24, 2014 1:30 AM