सोलापूर : महाआघाडी सरकारच्या स्थापनेनिमित्त शिवसेनेच्यावतीने शहरात लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या राष्टÑीय अध्यक्ष सोनिया गांधी यांचे फोटो झळकले आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येऊन राज्यात महाराष्टÑ विकास आघाडीची स्थापना केली आहे. समान विकास कार्यक्रम आखून ही आघाडी सरकार चालविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानिमित्त शहरात लावण्यात आलेल्या फलकावर समान विकास कार्यक्रमाची झलक पाहायला मिळत आहे.
सेना नगरसेवकांच्या फलकावर तीनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. याबद्दल शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील म्हणाले, राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. सर्वच नेत्यांनी विश्वास दाखवून हे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते एकमेकांना विश्वासात घेऊन काम करतील, असा विश्वास देण्यात येणार आहे. जिल्हाप्रमुख गणेश वानकर म्हणाले, स्थानिक पातळीवरील तीनही पक्षांच्या पदाधिकाºयांनी एकत्र येऊन जल्लोष केला होता. केवळ जल्लोष न करता एकमेकांना सोबत घेऊन शहराच्या विकासाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न होणार आहे. एकमेकांच्या वरिष्ठ नेत्यांचा आदर म्हणून हे फ्लेक्सवर प्रमुख नेत्यांचे फोटो घेण्यात आले आहेत.