मुंबई - महाविकास आघाडी एकत्रितपणे पुढील निवडणुक लढवले. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी मजबुतीने प्रयत्न करेल, असे तिन्ही पक्षांकडून सातत्याने सांगितले जाते. मात्र, आता लोकसभेच्या जागा वाटपावरुन तिन्ही पक्ष आमने-सामने आल्याचं दिसून येत आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी जागा वाटपाबाबत विधान करताना आमच्या १९ जागा आहेत, असे म्हटले आहे. मात्र, सध्या शिवसेनेकडे केवळ ५ खासदार असल्याचं सांगत राष्ट्रवादीने त्यांना फटकारलं आहे. तर, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना हा ३ ऱ्या क्रमांकाच पक्ष असल्याचं म्हटलं आहे.
महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण यावरुन वाद समोर आला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी हा मोठा भाऊ असल्याचं म्हटलं होतं. त्यावर, काँग्रेसनेही पलटवार केला आहे. लहान भाऊ कोण अन् मोठा भाऊ कोण यावरून वादाचे सूर निघू लागले आहेत. काँग्रेसने तर लहान-मोठे जाऊ द्या, राष्ट्रवादीचा जन्मच आमच्या उदरातून झाला असल्याचा टोला राष्ट्रवादीला लगावला आहे. तर, या वादावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य करताना उद्धव ठाकरेंची शिवसेना ३ ऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे म्हटले.
पक्षाच्या वाढीकरता प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक स्टेटमेंट देत असतात त्यात काही गैर नाही. आजच्या महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस दोन नंबरचा आहे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा तिसऱ्या नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे विधान करण्यामध्ये काही चुकीचं नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. तसेच, जागा वाटापामध्ये आत्तापर्यंत दोन ते तीन सूत्र वापरत होतो. आतापर्यंत जे जे निकाल आहेत, त्याचा विचार करून जागा वाटपाचा निर्णय होईल. या घडीला भाजपाला कोणता पक्ष पराभूत करेल यावर चर्चा करणे गरजेचे आहे. त्यामुळे ह्या स्टेटमेंटला फार काही विशेष अर्थ नाही. जागा वाटपाकरता गंभीरतेने बसून एक सूत्र ठरवू, असेही चव्हाण यांनी सांगितले.
आमच्या १९ जागा कायम आहेत - राऊत
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे. परंतु अद्याप जागावाटपाचा कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही. लवकरच प्रमुख नेत्यांची बैठक होईल. त्यात जागावाटपाची चर्चा होईल. आमचा १९ चा आकडा कायम आहे. आम्ही या जागा जिंकलेल्या आहेत, असा खुलासा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. महाविकास आघाडी मजबूत आहे. १९ आकडा कायम राहील. महाराष्ट्रात शिवसेना १९ आकडा कायम ठेवेल, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. प्रमुख नेत्यांची बैठक होईल त्यात निर्णय होईल असंही त्यांनी म्हटलं.