सोलापूर : पन्नास फूट खोल कोरडी विहीर. आत उतरणेही अवघड. अशा विहिरीत उदमांजर पडले. कंदलगाव येथील ही घटना. शेतकऱ्याने प्राणीमित्रांना माहिती दिली. सहाजणांच्या रेस्क्यू टीमने दोन तास केलेल्या अथक परिश्रमानंतर उदमांजराला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. शनिवारी मोहीम पार पडली. एक दिवस निरीक्षणाखाली ठेवून रविवारी त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
कंदलगाव येथील शेतकरी विनय कोले यांनी त्यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत मांजर पडल्याचे पाहिले. विहीर पन्नास फूट खोल होती. काही केल्या त्या मांजराला वर येता येत नव्हते. त्यांनी लागलीच वनविभागाला याची कल्पना दिली.
वनमजूर संजय काटकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ढगाळ वातावरण आणि बारीक पाऊस व अंधार होत असल्याने रेस्क्यू मोहीम २१ मे रोजी करण्याचे ठरले. त्यानुसार शनिवारी (२१) रेस्क्यू टीम मल्लिकार्जुन धुळखेडे, राहत संस्थेचे डॉ. आकाश जाधव, भीमाशंकर विजापुरे, वन विभागाचे मुन्ना निरवणे, वाईल्ड लाईफ केअरचे मुकुंद शेटे व गणेश तुपदोळे सर्व साधनांसह घटनास्थळी दाखल झाले.
साधारण ५० फूट खोल विहिरीत उतरण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता. योग्य जागा निवडून रेस्क्यू कीटद्वारे धुळखेडे, निरवणे, विजापुरे विहिरीत उतरले. तिघांना पाहून उदमांजर विहिरीत सर्वत्र धावत सुटले. मोठ्या शिताफीने त्रिकोणी स्टिकने पिशवीत सुखरूप पकडण्यात यश आले.
-----
दोन तास चालली मोहीम
ही मोहीम पार पाडण्यासाठी दोन तास कालावधी लागला. दोरीच्या सहाय्याने उदमांजरास अलगद वर उचण्यात आले. डॉ. जाधव यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. वन परिक्षेत्र अधिकारी खलाने यांना सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. उदमांजरास एक दिवस निरिक्षणात ठेवून औषधोचार करण्यात आले. रविवारी त्याच परिसरात सोडण्यात आले. ही मोहीम उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील (सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.