सोलापूर : हैद्राबाद रोडवरील दोड्डी गावाजवळ झालेल्या अपघातात एक उदमांजर व एक सायाळू ठार झाले. मागील काही दिवसांपासून दर चार दिवसात एका वन्यजीवाचा मृत्यू होत आहे. वन विभागाने या ठिकाणी जाळी बसवावी अशी मागणी वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे संतोश धाकपाडे यांनी केली.
संतोष धाकपाडे हे कामानिमित्त हैद्राबाद रोडवरुन जात होते. तिथे त्यांना एक उदमांजर व एक सायाळू मृत झाल्याचे दिसले. सायाळूच्या अंगावरुन वाहने गेल्याने त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत दिसून आला. एकानेही एक वन्यजीव मृत झाल्याचे पाहून त्यांचा मृतदेह बाजूला केला नव्हता. त्यामुळे उदमांजराच्या रक्त, अंगावरी काटे रस्त्यावर पसरले होते. तर उदमांजराच्या डोक्याला जोराचा मार बसल्याने ते मृत झाले होते. वन्यजीवप्रेमींनी उदमांजराचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला नेला.
या रस्त्यावर नेहमी अपघात होत आहेत. ते थांबविण्यासाठी परिसरात मार्गदर्शक सूचना, वाहन सावकाश चालविण्याच्या सुचनांचे बोर्ड लावावे. यासोबकतच रस्त्याच्याकडेला जाळी लावावी अशी विनंती वन्यजीवप्रेमींकडून होत आहे.