लक्ष्मण कांबळे ।
लऊळ : चाळीस वर्षांपूर्वी काही युरोपियन लोक माढ्यात आले. त्यांनी तेथे मिशनरी हॉस्पिटल चालू केले. दिवसभर फिरून रूग्णांवर ते उपचार करत असत. युरोपियन लोक सातासमुद्रापार येऊन इथल्या रूग्णांची सेवा करतात, मग आपण का करू नये, हा विचार यु. एफ. जानराव यांच्या मनात आला. त्यांनी हा विचार कृतीत उतरविला़ अकरा वर्षे आरोग्यसेवा केली. त्यानंतर १९९२ पासून शासकीय सेवेत कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून कुष्ठरोग्यांची सेवा सुरू केली आणि बघता बघता ते त्यांचे देवदूतच बनले.
३८ वर्षे झालीत. ते माढा, बार्शी व पंढरपूर तालुक्यातील कुष्ठरोग्यांची सेवा करण्यातच रमले आहेत. १९८० च्या दशकात राज्यातील ग्रामीण व शहरी भागात कुष्ठरूग्ण जास्त प्रमाणात होते. त्यावेळी समाजात या रोगाबद्दल गैरसमज व अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात होती. अशा काळात कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांचे अश्रू पुसण्याचे काम यु.एफ. जानराव यांनी अविरतपणे केले.
या सेवेमुळेच त्यांना रूग्णांनी डॉक्टर ही पदवी बहाल केली. बार्शी तालुक्यातील संगमनेर येथे गरीब कुटुंबात जन्मलेल्या जानराव यांनी मॅकेनिकल इंजिनिअर होण्याचे स्वप्न बाळगले होते. पण नियतीने त्यांना वेगळ्याच वाटेवर धाडले. गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची प्रेरणा घेऊन कुष्ठरोग निवारणासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले.
विवाह जमवून कौटुंबिक पुनर्वसन...- त्यांच्या या सामाजिक कामाची दखल विविध सामाजिक संस्थांनी घेत राज्यस्तरीय २३ पुरस्कार बहाल केले आहेत. याशिवाय १५ वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे साहित्य क्षेत्रातील कार्यही वाखाणण्याजोगे आहे. कुष्ठरोग्यांची नुसती सुश्रुषा करून ते थांबले नाहीत तर शासकीय योजनेतून त्यांचे संसार उभे केले. अनेकांचे विवाह जमवून त्यांचे कौटुंबिक पुनर्वसन केले. शासनाने याची दखल घेऊन पुरस्कारासोबत आगाऊ वेतनवाढीही दिल्या आहेत.