सोलापूर : आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शनाची सुरुवात मंगळवार, १७ डिसेंबरपासून मुंबईत होत आहे़ या प्रदर्शनात युगांडा सरकारचा एक विशेष स्टॉल असणार आहे़ त्यांच्या देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी येथील उद्योजकांनी युगांडात लघु उद्योग उभारावेत, अशी त्यांची अपेक्षा आहे़ त्यांच्या देशातील उपलब्ध साधनसामुग्री तसेच सरकारच्या विविध सोयीसुविधांची माहिती या स्टॉलमध्ये देण्यात येणार आहे़ गारमेंट, फूड प्रोसेसिंग तसेच इतर लघु उद्योजकांना युगांडा सरकारकडून विशेष आमंत्रण असल्याची माहिती युगांडा शिष्टमंडळ समिती समन्वयक पारस शहा यांनी दिली.
सोलापूर जिल्हा रेडिमेड कापड उत्पादक संघ तसेच केंद्रीय लघु उद्योग विभागाच्या सहकार्यातून मुंबईत गारमेंट प्रदर्शन होत आहे़ १९ डिसेंबरपर्यंत गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये प्रदर्शन नियोजित आहे़ काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील युगांडाचे राजदूत ग्रेस अकेल्लो यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ तसेच युगांडा सरकार प्रतिनिधींची विशेष बैठक झाली़ या बैठकीत गारमेंट उद्योगाबाबत चर्चा झाली़ मागच्या महिन्यात युगांडा सरकार प्रतिनिधींनी सोलापुरातील गारमेंट उद्योगाची पाहणी केली. त्यांना येथील गारमेंट व्यवसाय खूपच आवडला़ सोलापुरात रेडिमेड कापड व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
लघु उद्योगांतर्गत सुरु असलेला गारमेंट व्यवसाय त्यांच्याही देशात सुरु व्हावा, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली़ त्याकरिता युगांडा सरकार विशेष सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ त्यानंतर युगांडा सरकार प्रतिनिधी शिष्टमंडळाने केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाशी संपर्क साधला़ सरकारनेही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला़ त्यामुळे मुंबईत होणाºया आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शनात युगांडा प्रतिनिधी त्यांच्या सरकारच्या सोयीसुविधा आणि विशेष सवलती याबाबत जाहिरात करणार आहेत़
जागतिक मार्केटिंग करण्याची संधी- अधिक माहिती देताना युगांडा शिष्टमंडळ समिती समन्वयक पारस शहा यांनी सांगितले, युगांडाची लोकसंख्या साडेपाच कोटी इतकी आहे़ येथे ६७ टक्के इतके सुशिक्षित बेरोजगार आहेत़ त्यांच्या हातांना काम देण्याकरिता युगांडा सरकारकडून विशेष मोहीम सुरु आहे़ या मोहिमेंतर्गत भारतातील त्यांचे राजदूत ग्रेस अकेल्लो यांनी सरकारमार्फत आमच्याशी संपर्क साधला़ युगांडाचे प्रतिनिधी सोलापुरात आले़ येथील गारमेंट उद्योगातील बारकावे समजून घेतले़ त्यांना येथील गारमेंट उद्योगाची संकल्पना खूपच आवडली़ त्यांच्या देशात गारमेंट व्यवसाय सुरु करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे़ पण, त्यांच्याकडून कोणत्या सुविधा मिळणार आहेत, हे अद्याप अस्पष्ट आहे़ त्यामुळे भारत सरकारमार्फत आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत़ मुंबईत होणाºया आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शनात युगांडा सरकारचेही विशेष स्टॉल आहे़ त्यांच्याकडून राज्यभरातील गारमेंट उद्योजकांना आमंत्रण देण्यात येणार आहे़ यातून राज्यातील गारमेंट उद्योजकांना जागतिक मार्केटिंगची संधी मिळणार आहे़