पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही या परिसरात पाणीपातळी वाढण्यास उपयुक्त पाऊस झाला नाही. त्यामुळे शेती पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. असे असताना उजनी कालव्यातून पाणी सोडण्याच्या शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीला शासन स्तरावरून प्रतिसाद देऊन उजनीच्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले आहे. परंतु, वीज वितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी थेट रोहित्र बंद करण्याचा सपाटा चालू केला आहे.
या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीची सोडाच, पण पिण्याच्या पाण्याचीही पंचाईत झाली आहे. अशातच खराब हवामान असल्यामुळे द्राक्ष, डाळिंब बागांची फवारणी करणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे बागांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोरोनाने शेतकरी आर्थिक संकटात
मागील १७ महिन्यांपासून देशात कोरोनाने चांगलेच प्रस्थ माजवले आहे. शेतीमध्ये पीक आहे, परंतु पिकाला भाव मिळत नाही. कवडीमोल दराने शेतीमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच वीज वितरण कंपनीने वीजबिल वसुली मोहीम थेट रोहित्रे बंद करून सुरू केली आहे. त्यामुळे शेती पिकांना याचा फटका बसून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे.
कोट :::::::::::::::::
मागील तीन महिन्यांपूर्वी प्रतिरोहित्र ५० हजार रुपये बाकी भरून घेतली. असे असताना वीज बिलासाठी रोहित्र बंद करणे महावितरणने बंद न केल्यास आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागेल.
- शहाजान शेख
जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना