दीपक दुपारगुडे, सोलापूर / टेंभूर्णी : बऱ्याच प्रतीक्षेनंतर सोमवारी सायंकाळी उजनी धरण साठ टक्के पार झाले. दौंडमधून उजनीमध्ये होणारा विसर्ग आणखीन कमी झाला असून, सध्या केवळ दोन हजार १०० इतका विसर्ग आहे. शनिवारी पाच हजार फ्लो होता. तर रविवारी सकाळी ३ हजार ४०० वर इतका होता.
सोमवारी हा फ्लो आणखीन कमी होऊन दोन हजार १०० इतका झाला. धरणामध्ये ९५.७५ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून, यातील ३२.१० इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणक्षेत्राच्या वरील बाजूला होणारा पाऊसदेखील पूर्णपणे थांबला आहे. यामुळे आता पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आणखीन कमी आहे. परंतु धरणातील उपलब्ध जलसाठा व संपत आलेला पावसाळा याचा विचार करूनच शासन व प्रशासनास पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.