गणेश पोळ
टेंभुर्णी : सोलापूर, पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण सकाळी ९.३० वाजता मृत साठ्यातून बाहेर येऊन ०.१३ टक्के उजनी धरणाची पाणी पातळी झाली होती. सात महिन्यापुर्वी उजनी २१ जानेवारी रोजी मृत साठ्यात गेले होते. गेल्या ५६ दिवसात ३३ टिएमसी पाणीसाठा उजनी धरणात जमा झाला आहे. तर गेल्या २४ तासात १४ टक्यांनी उजनीची झपाट्याने वाढ झाली आहे.
गुरूवारी सायंकाळी बंडगार्डन येथील १ लाखाचावर असणारा विसर्ग घटला असला तरी दौंड येथील विसर्ग दीड लाख क्युसेक पर्यंत गेला आहे. सध्या बंडगार्डन येथून ४१ हजार ५७१ क्युसेक विसर्ग असून दौंड येथून १ लाख ४८ हजार १४९ क्युसेकने पाणी उजनी धरणात मिसळत आहे. गेल्या २४ तासात उजनी धरणात ८ टिएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. आज ( दि. २६ ) शुक्रवार पासून उजनी उपयुक्त पाणी पातळीत येणार असून उजनी धरण शंभर टक्के भरल्यास ऊस लागवडीला वेग येणार आहे.
खडकवासला धरणातून विसर्ग
भीमा खोऱ्यातील आठ धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. पुणे शहरातील पुराची पातळी स्थीर रहावी म्हणून खडकवासला धरणातून कमी अधिक प्रमाणात सातत्याने विसर्ग सोडण्यात येत आहे. सातारा व पुणे जिल्ह्याला हवामान खात्याने शुक्रवारी रेड अलर्ट दिल्याने ९० टक्के पर्यंत भरलेले खडकवासला धरण ६३ टक्के पाणी पातळी कमी केली आहे. खडकवासला मधून १४ हजार क्युसेक, मुळशी १० हजार ७००, कासारसाई १ हजार ६००, वडीवळे २ हजार १७२, चासकमान ६ हजार ३०, कळमोडी ३ हजार, चिलईवाडी २ हजार, वडज ४ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.