मंगळवेढा : दत्तात्रय भरणे यांना सोलापूरकरांच्या पुण्याईने सोलापूरचे ‘पालकत्व’ करण्याची संधी मिळाली. याचा फायदा घेऊन त्यांनी जनतेची सेवा करायला पाहिजे होती; मात्र झालं उलटंच. त्यांनी इथल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा घणाघात करून उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाण्याच्या रद्द केलेल्या तोंडी आदेशाला शासकीय लेखी अध्यादेश काढा अशी मागणी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी केली.
उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाण्याचा अध्यादेश रद्द करावा, शासकीय अध्यादेश काढा या मागणीसाठी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने मंगळवेढा - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी उपाध्यक्ष ॲड. बापू मेटकरी म्हणाले, उजनी धरण हे सोलापूर जिल्हावासीयांच्या हक्काचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपुरे प्रकल्प आणि तहानलेल्या गावाला पाणी देण्याऐवजी बारामतीकरांनी जाणून बुजून डावपेच करत पाच टीएमसी पाणी इंदापूरला वळवले आहे.
यावेळी सचिव माऊली हळणवर, दीपक भोसले, बंडू गरड, सदस्य धनाजी गडदे, आप्पासाहेब मेटकरी, माऊली बंडगर, शिवाजी टकले, धर्मा मरिआईवाले, सचिन पांढरे, यल्लाप्पा पडवळे, अक्षय देवकते, भागवत सोमुत्ते, राहुल टेकनर, विजय ताडसह शेतकरी उपस्थित होते.