करमाळा : उजनी जलाशयाच्या काठावर असलेल्या कंदर, सांगवी, कविटगाव, वांगी, उम्रड, कुगाव, चिखलठाण, वाशिंबे, केत्तूर, टाकळी, कोंढार-चिंचोली, खातगाव, कात्रज, जिंती, पोमलवाडी शिवारात केळीचे क्षेत्र खूपच वाढले आहे. उजनी लाभक्षेत्रातील हिरवीगार शेती मनमोहक असून सौंदर्यात भर घालणारी आहे. त्याच जोडीला देशी-विदेशी पक्ष्यांचा मेळा पर्यटकांना भुरळ घालणारा आहे.
उजनी पाणलोट क्षेत्रात ऊस व केळीची शिवारे दिसून येतात. ऊस उत्पादनातून मिळत गेलेल्या रकमेमुळे उजनी लाभक्षेत्रातील बहुतांशी शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्थिर झाले आहेत. या पार्श्वभूमीवरच त्या शेतकऱ्यांची प्रयोगशीलता वाढली. शेतीत वेगवेगळे प्रयोग करून कमी वेळ, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यामुळेच अनेक शेतकरी ऊसाच्या जोडीने केळी लागवडीकडे वळल्याचे दिसून येत आहे.
उजनी पाणलोट क्षेत्रात धरणातील पाण्याच्या भरवशावर प्रामुख्याने ऊसाचे बागायती पीक घेण्याचे प्रमाण वाढले होते. हा भाग ऊसाचे आगार म्हणूनच ओळखला जावू लागला होता. सोलापूरसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे येथील ऊसावर लक्ष राहिले आहे; मात्र उजनीच्या पाण्याचा भरवसा आता उरलेला नाही, अशी या भागातील ऊस उत्पादकांची मानसिकता होऊ लागली आहे. परिणामी, उजनी लाभक्षेत्रातील पीक पद्धतीत बदल होत असून, ऊसाऐवजी केळी तसेच इतर फळबागांच्या लागवडीला प्राधान्य देणारांची संख्या वाढली आहे.
अपुऱ्या पावसानंतर भीषण दुष्काळाची चिन्हे असताना उजनी धरणातील पाणी तळपातळीकडे सरकत असताना यावेळी पक्ष्यांसाठी पोषक असे वातावरण उजनी पाणलोट भागात निर्माण झालेले असते. या पार्श्वभूमीवर पक्ष्यांचे आश्रयस्थान असणाऱ्या उजनी परिसरात अनेक प्रजातीचे देशी-विदेशी पक्षी उजनीच्या आश्रयाला आलेले आहेत.
उजनीवरील पक्षी सौंदर्य
दरवर्षी येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसोबतच यापूर्वी उजनीवर न दिसलेले पक्षीही यंदा दिसत असल्याची माहिती पक्षी प्रेमींकडून मिळत आहे. उजनीचे आकर्षण असणाऱ्या फ्लेमिंगोंच्या ग्रेटर व लेसर या प्रजातीच्या पक्ष्यांमुळे उजनीवरील पक्षीसौंदर्य चर्चेचा विषय आहे. धरण परिसरात देशी-विदेशी पक्ष पर्यटकांना आकषित करते. उजनीतील पाणी घटत असतानाच उजनीतील पाण्याच्या नियोजनाचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
फोटो ओळी : ०७करमाळा-बर्ड०१,०२
उजनी पाणलोट क्षेत्रात पर्यटकांचे लक्ष वेधणारे फ्लेमिंगो पक्षी.