साेलापूर : महापालिकेने उजनी ते साेलापूर समांतर जलवाहिनीच्या कामासाठी हायवेकडून ८० किमी जागा उपलब्ध करून दिली. पाइपलाइन टाकण्यास सुरुवात करा, असे पत्र महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्मार्ट सिटी कंपनीला दिले आहे. आता पाेचमपाड कंपनी काम करण्यास तयार नसल्याने नवा पेच निर्माण झाल्याचे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी साेमवारी सांगितले.
शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण हाेणेे अपेक्षित आहे. या कामाची वर्कऑर्डर हैदराबादच्या पाेचमपाड कंपनीला ऑगस्ट २०१९ मध्ये देण्यात आली. प्रत्यक्षात एक वर्षानंतर कामाला सुरुवात झाली. ११० किमीपैकी ९० किमी भूसंपादनाचे काम प्रलंबित हाेते; परंतु ठेकेदाराने उपलब्ध जागेपैकी २० किमीचे कामही वेळेवर पूर्ण केले नाही. जॅकेवल आणि ब्रेक प्रेशर टँकच्या कामातही हलगर्जीपणा झाल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. यादरम्यान पाेचमपाड कंपनीने ७४ काेटी रुपये जादा देण्याची मागणी स्मार्ट सिटी कंपनीकडे केली. महापालिकेने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ८० किमी जागा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने या जागेचे पैसे भरले नाहीत. मात्र, या जागेवर पाइप टाकण्याचे काम सुरू करण्यास राजमार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. तरीही पाेचमपाड कंपनी काम करण्यास तयार नाही. कंपनीच्या प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विराेधी पक्षनेता अमाेल शिंदे आणि एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी केली.
--
पाेचमपाड कंपनीला काम सुरू करण्याबाबत पत्र दिले आहे. कंपनीने काम सुरू केलेले नाही. त्यामुळे कंपनीवर दंडात्मक कारवाई सुरू आहे.
- संजय धनशेट्टी, मुख्य तांत्रिक अधिकारी, स्मार्ट सिटी.
जलवाहिनीच्या कामाची वाटचाल
- एकूण ११० किमीचे काम
- ४६४ काेटी रुपयांची निविदा (१२ टक्के जादा दराने टेंडर)
- पाेचमपाड कंपनीने २० किमी कामाचे पाइप आणले
- आजवर १५.२ किमी काम पूर्ण केले
- उर्वरित साडेचार किमीचे काम करण्यास विलंब
- नवीन पाइप खरेदीची ऑर्डर देण्यासह विलंब