सोलापूर : औज बंधारा कोरडा पडून पाच दिवस झाले. जलसंपदा विभाग उजनी धरणातूनपाणी सोडण्यास विलंब लावीत आहे. या विषयात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी महापौर शोभा बनशेट्टी यांनी केली आहे.
औज बंधारा हा शहराच्या पाणीपुरवठ्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. या बंधाºयातून टाकळी इनटेकमध्ये पाणी घेतले जाते. टाकळी इनटेकमध्ये सध्या २५ मार्चपर्यंत पुरेल इतके पाणी आहे. उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी औज बंधाºयापर्यंत पोहोचण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. उजनीतून १५ मार्चपर्यंत पाणी सोडावे, असे पत्र महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाला दिले आहे. जानेवारी महिन्यात सोडलेले पाणी १० एप्रिलपर्यंत पुरवावे, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला सांगितले होते. पण कर्नाटक हद्दीतून बेसुमार उपसा झाल्याने औज बंधाºयातील पाणी लवकर संपले.
सध्या उजनीतून कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. तोपर्यंत भीमा नदीत पाणी सोडता येणार नसल्याची अडचण जलसंपदा विभागाने सांगितली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी नुकतेच लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले होते, पण कार्यवाही झालेली नाही.
विरोधकांनी मनपामध्ये केला होता गोंधळ
-शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि उजनी धरणातून लवकर पाणी सोडावे, या मागणीसाठी काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी गुुरुवारी सकाळी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या कार्यालयात घोषणाबाजी केली होती. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास सोलापूर बंद करू, असा इशाराही देण्यात आला होता. पण या विषयाचे राजकारण करू नका, आम्ही पाठपुरावा करीत आहोत, असे महापौर बनशेट्टी यांनी सांगितले. यादरम्यान, महापौर बनशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास लोक नाराज होतील. त्यामुळे जलसंपदा विभागाला पाणी सोडण्याबाबत तत्काळ आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार महापालिकेने औज बंधाºयातील पाणी १० एप्रिलपर्यंत पुरविणे अपेक्षित होते, पण त्यांनी पाण्याचे संरक्षण केले नाही. सध्या कालव्यांमधून सिंचनासाठी पाणी सोडलेले आहे. शेतकºयांची गरज महत्त्वाची आहे. हे पाणी बंद करून भीमा नदीत पाणी सोडावे लागेल, पण आम्ही लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. - धीरज साळेअधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण