‘पंढरपूर’चं ‘बारामती’ करू, अशी स्वप्नं दाखविणाऱ्या ‘दादां’ची भाषणं अजूनही ताजी.. निवडणुकीचा निकालही अद्याप न लागलेला; तोपर्यंत ‘उजनी’चं ‘वाळवंट’ बनविण्याचा कट पूर्वीच शिजल्याचा वास लागलेला. मुळात ‘उजनी’ धरण बांधलं पिण्याच्या पाण्यासाठी. दर उन्हाळ्यात मायनसमध्ये जाणारं हे धरण सोलापूरकरांसाठी जणू मृगजळच. या धरणापायी शेकडो गावं उद्ध्वस्त झाली, हजारो धरणग्रस्त बेघर झाले, निर्वासित बनले. एकीकडं महाराष्ट्रातलं सर्वात मोठ्ठं धरण म्हणवून शेखी मिरवायची, दुसरीकडं पाच दिवसांआड येणाऱ्या नळाच्या पाण्याला गुपचूप मोटार बसवायची. आता हे कमी पडलं की काय म्हणून याच धरणाचं पाच टीएमसी पाणी इंदापूरच्या शेतीला वळविण्याचा (की पळविण्याचा?) डाव साधला गेला.
ही कल्पना कुणाच्या ‘सुपीक’ डोक्यातून आली असावी, हे इथल्या स्थानिक ‘घड्याळ’वाल्यांना माहीतच असणार. मात्र, सत्तेची दोरी तोंडाला बांधलेली. कोण तोंड उघडणार अन् रागीट ‘दादां’चा राग विनाकारण ओढवून घेणार ! असो, इंदापूरचे ‘मामा’ आपल्या भूमीला जागले. आता माढ्याचे ‘मामा’ मात्र भूमीला जागतात की, राजकीय निष्ठेला, याकडं साऱ्यांचं लक्ष. अजून एक आतली चर्चा. मंत्रिमंडळाच्या नव्या बदलात कदाचित त्या ‘मामां’चं पालकत्व जाणार... अन् या ‘मामां’ना लालदिव्याची गाडी लाभणार.
...पण ‘मोहोळ’च्या ‘यशवंतरावां’ना ‘पालकत्व’ देण्याबाबत म्हणे ‘बळीरामकाका’ अन् ‘अनगरकर’ आग्रही. मंत्रिपद मतदारसंघातच राहतं अन् सुंठेवाचून ‘मामां’चा खोकलाही जातो, हा दोघांचा होरा. असं झालं तर जिल्ह्याच्या नशिबी पुन्हा इंदापूरचीच गाडी...लगाव बत्ती...
‘मामा इंदापूरकर’ गेल्या वर्षभरात ‘सोलापूरकरां’ना कधी आपले वाटलेच नाहीत. कुणाचाही कॉल न घेणं ही त्यांची जशी खासियत, तसेच सोलापूरचे कोणतेच प्रश्न गांभीर्याने न घेणं ही त्यांची स्टाइल. ‘आपण आता विरोधी पक्षात आहोत’ याची अजूनही जाणीव न झालेली ‘देशमुख’द्वय मंडळी ‘मामां’बद्दल कधी ‘ब्र’ शब्द काढताना न दिसलेली. मात्र, धनुष्यवाल्या ‘बरडें’पासून ‘हात’वाल्या ‘प्रकाशरावां’पर्यंत अनेक सहकाऱ्यांनीच या ‘मामां’विरोधात उठाव केलेला. आतातर हा ‘पालकमंत्री’च बदला, अशी मागणी ‘——’च्या ‘पाटलां’नी केलीय. का तर म्हणे, त्यांना माळशिरस तालुक्याच्या एकाही मिटिंगला बोलावले नाही. गेली पाच वर्षे ‘जिल्हाध्यक्ष’ असलेल्या या ‘पाटलां’ना मिटिंग म्हणजे काय, हेच माहीत नाही, हा भाग वेगळा... लगाव बत्ती...
भाऊ गल्लीबोळातच रमले...
बाहेरचा पालकमंत्री आणून जिल्ह्याचा कारभार हाकू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या साठमारीत जिल्हा पातळीवरील कणखर विरोधी नेतृत्वाची पोकळी निर्माण झालीय. नेहमी संधीची वाट पाहणारे बार्शीचे ‘राजाभाऊ’ मात्र अद्याप गल्लीबोळातल्या राजकारणातच अडकलेत. परजिल्ह्यातल्या रुग्णांना केवळ बार्शीच नव्हे, तर परराज्यातल्यांनाही अवघा जिल्हा बरा करतोय, ही भूमिका घेऊन ते पुढं सरसावले असते तर कदाचित बाकीच्या तालुक्यांमधूनही त्यांना उत्स्फूर्त सपोर्ट मिळाला असता. ‘फेसबुक’वरनं कौतुकाचं ‘लाइव्ह-बिइव्ह’ही नेहमीप्रमाणं झालं असतं.
असो. या ‘राजाभाऊं’ना परवा रात्री अकरा वाजता ‘वर्षा’ बंगल्यावरून थेट फोन आला, ‘काय राजाऽऽ काय चाललंय ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ विचारत ‘सीएम’नी बराच वेळ चर्चाही केली. किती गंमत नां... एकीकडं ‘देवेंद्र नागपूरकरां’वर निष्ठा ठेवलेल्या ‘राजाभाऊं’ना आजही ‘उद्धो ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ मोठ्या हक्कानं एकेरी हाक मारतात, दुसरीकडं याच ‘उद्धों’चं ‘धनुष्य’ घेऊन लढलेले ‘दिलीपराव’ पंढरपुरात ‘अजितदादां’च्या मांडीला मांडी लावून स्टेजवर बसतात. बार्शीचं राजकारणच लय येगळं राऽऽव.
पंढरपूरच्या स्टेजवरनं आठवलं. मंगळवेढ्याच्या भाषणात ‘दिलीपरावां’नी वाघाची गोष्ट सांगितली. वाघाची शिकार करायला चांगली बैठक असावी लागते, असं त्यांनी गालातल्या गालात हसत सांगितलं. हे ऐकून समोरची मंडळी गोंधळली. बार्शीच्या नेत्याची भाषा कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या कानी पडली असावी. संतांच्या नगरीतल्या एकानं दुसऱ्याला कानात विचारलं, ‘ही बैठक कशी असते गड्याऽऽ’ दुसराही गडबडला. त्यानं थेट बार्शीतल्या पाव्हण्याला कॉल केला. तेव्हा लगेच विषय बदलत तो हुश्शऽऽर पाहुणा एवढंच बोलला, ‘नेत्यांच्या भाषेत बैठक म्हणजे शिकारीसाठी दबा धरून बसणं. यंदाच्या नगरपालिका इलेक्शनमध्ये दिसेल बघा तुम्हाला ही बैठक.’ फोन खडाऽऽक. लगाव बत्ती...