सोलापूर : उजनीतून भीमा नदीत सोडण्यास होत असलेला विलंब आणि शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विषयावरून काँग्रेस, शिवसेना, बसपा, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर कार्यालयात ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली. उजनी धरणातून वेळेवर पाणी न सोडल्यास सोलापूर बंद करण्यात येईल, असा इशारा चंदनशिवे, नरोटे, किसन जाधव यांनी दिला.
मनपाची गुरुवारी सर्वसाधारण सभा होती. सकाळी ११ वा. सभेला सुरुवात झाली. सभागृहात प्रभाकर जामगुंडे आणि गुरुशांत धुत्तरगावकर हे दोघेच होते. कोरमअभावी ही सभा तहकूब करीत असल्याचे महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितले. कोरमअभावी तुम्ही सभा तहकूब करू शकता आणि कोअर पूर्ण झाल्यास पुन्हा सभा घेणार का?, असा प्रश्न जामगुंडे यांनी विचारला.
नगरसेवक धुत्तरगावकर यांनी शहरातील पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करावी, अशी मागणी केली. पण तोपर्यंत महापौर बनशेट्टी यांनी सभागृह सोडले.
यानंतर काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर, गणेश पुजारी, अनुराधा काटकर, भारतसिंग बडूरवाले आदींनी महापौर कार्यालयात ठिय्या मारला. महापौर, सभागृह नेता, पालकमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यानंतर महापौर बनशेट्टी आणि नगरसेवक नागेश वल्याळ कार्यालयात आले. आचारसंहिता असल्याने आयुक्तांना किंवा प्रशासनाला आम्ही आदेश देऊ शकत नाही. पण उजनी धरणातून वेळेवर पाणी सुटेल. चिंता करू नका, असे सांगितले. पण नगरसेवक ऐकायला तयार नव्हते. आयुक्त दीपक तावरे यांनी महापौर कार्यालयात येऊन स्पष्टीकरण द्यावे, यावर नगरसेवक ठाम राहिले.
पालकमंत्री निष्क्रिय : काँग्रेस, बसपाचा आरोप महापौर कक्षात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मनपा आयुक्त दीपक तावरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पालकमंत्री निष्क्रिय आहेत. त्यांना शहरातील समस्या कळत नाहीत. त्यांच्या निष्क्रियतेमुुळेच उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी मिळत नाही, असा आरोप काँग्रेस आणि बसपाने केला.
तर २० मार्चला सोलापूर बंद : नगरसेवकांचा इशारामहापौरांनी आयुक्तांना फोन लावला. पण त्यांनी आचारसंहितेमुळे महापौर कार्यालयात कोणत्याही प्रकारची बैठक घेता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे बसपा, काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक आयुक्त कार्यालयात गेले. याठिकाणी काँग्रेसचे यु. एन. बेरिया नगरसेविका श्रीदेवी फुलारे, फिरदोस पटेल, राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव, ज्योती बमगोंडे, स्वाती आवळे आदी नगरसेवक आले. पाणीपुरवठ्याची कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जलसंपदा विभागाकडून असहकार्य करीत आहे. शहरात पाणीटंचाई होऊ देणार नाही, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
औज बंधारा कोरडा पडला आहे. उजनी धरणातून दोन दिवसांत पाणी सोडले नाही तर चार ते पाच दिवसाआड पाणी येईल, असे अधिकारी सांगत आहेत. अशावेळी भाजपचे पदाधिकारी झोपा काढत आहेत. लोकांना पाणी देतो म्हणून मते मागता आणि पाण्याचा प्रश्न विचारला तर आचारसंहिता असल्याचे सांगता. - श्रीदेवी फुलारे, नगरसेविका, काँग्रेस
उजनीतून लवकरात लवकर पाणी सोडण्याची गरज आहे. भाजप नगरसेवकांना याचे गांभीर्य दिसत नाही. खरे तर सभागृहात या विषयावर चर्चा व्हायला हवी होती. सर्वपक्षीय नगरसेवकांनी मिळून जिल्हाधिकाºयांची भेट घ्यायला जाऊ, असे सांगायला हवे होते. पण त्यांनी पळ काढण्याचे काम केले आहे. - फिरदोस पटेल, नगरसेविका