सोलापूर/उळे : सध्याच्या कोविड १९ कोरोना विषाणूच्या प्रादूभार्वाच्या कठीण परिस्तिथीमध्ये जे ऊसतोड मजूर कोल्हापूर येथून नांदेड येथे चालत निघाले होते़ याशिवाय जे कामगार उस्मानाबाद येथून तामिळनाडूकडे चालत चालले होते. त्या स्त्री, पुरूष, लहान मुलांची खाण्यापिण्यासह राहण्याची उत्तम सोय उळे ग्रामस्थांनी केली़ घरच्याप्रमाणेच इथेही सोय झाल्याने मागील महिन्यांभरापासून या ऊसतोड मजूरांना आता उळेकरांचा चांगलाच लळा लागल्याचे दिसून येत आहे.
सध्या कोरोना या विषाणूजन्य आजाराने थैमान घातलेले आहे़ आपल्या देशात लॉकडाऊन जाहीर झाले आणि जो जिथे आहे तिथेच थांबला. राज्यांच्या सीमा, जिल्ह्यांच्या सीमा, गावाच्या सीमा बंद झाल्या़ वाहने बंद, रेल्वे बंद, एस. टी.ही बंद झाली़ कारखाने, व्यवसाय, व्यापारही बंद झाले. त्यामुळे हातावरील पोट असणारी मजूर, कामगार मंडळी हतबल झाली. अनेक लोकांचे लोंढे आपापल्या गावाकडे जाण्यासाठी चालत निघाले. या विषाणूची घातकता फार असल्याने शासनाने अशा चालत जाणाºया लोकांना थांबवून त्या त्या गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोय करण्याचे निर्देश दिले, त्याच पार्श्वभूमीवर उळे गावचे सरपंच सुरेश डांगे, उपसरपंच अप्पासाहेब धनके, शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम शिंदे, मुख्याध्यापक बशीर तांबोळी, कोरोना बाबत प्रशिक्षण झालेले शिक्षक महादेव हेडे, पोलीस पाटील पांडुरंग कुंभार, ग्रामसेवक पठाण, ग्रामपंचायत कर्मचारी पिंटू कुंभार तसेच ग्रामस्थ नितीन कुंभार, अविनाश मुळे यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करून शाळेच्या सर्व खोल्या रिकाम्या करून एक खोलीत ४ याप्रमाणे नियोजन करून २८ स्त्रिया, पुरुष व लहान मुले यांची सोय करण्यात आली.----------------परजिल्ह्यातील मजुरांची
दररोज होतेय आरोग्य तपासणी...
भोजनाची सोय होई पर्यंत कांही दिवस पुरेल इतका अन्नसाठा, गॅस,किचनरूम सह ताब्यात देण्यात आले आहे़ स्वच्छ शौचालय, पाण्याची कमतरता भासू नये म्हणून बोअर चालू करण्यासाठी मोटरची (रूम) चावी तसेच गॅस अचानक संपला तर अडचण येऊ नये म्हणून जळण ही दिलेले आहे़ पोषण आहार मटेरियल शिवाय सर्व जीवनावश्यक वस्तू, पिण्याचे पाणी जार, ज्वारी, गहू ,पालेभाज्या, स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, दूध, तेल ,साबण, डेटॉल, फिनेल आणि आरोग्याच्या संरक्षणासाठी औषधोपचाराची सोय ग्रामपंचायत उळे यांनी केलेली आहे. शिवाय गावातील दानशूर व्यक्ती ही मदत करत आहेत. सोलापूर बाजार समितीनेही मोलाची मदत केलेली आहे. दररोज या मजुरांची आरोग्य तपासणी डॉक्टर मार्फत होत आहे.---------------
कोरोना या विषाणूचा गावातील कोणत्याही व्यक्तीला संसर्ग होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने काळजी घेतली आहे़ आशा वर्कर यांच्यामार्फत गावातील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे़ यासाठी उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे, तहसिलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी, आरोग्याधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्यासह आदी ग्रामस्थ वेळोवेळी सहकार्य करीत आहेत.
- सुरेश डांगे,सरपंच, उळे ग्रामपंचायत