सोलापूर : दोन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारपासून लेखणी बंद आंदोलन पुकारले होते. शुक्रवार पर्यंत वेतन जमा करण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने संघटनेला दिल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवार पर्यंत लेखणी बंद आंदोलन स्थगित केले आहे. शुक्रवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा न झाल्यास सोमवारपासून पुन्हा लेखणी बंद आंदोलन करणार असल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी दिली आहे.
जुलै आणि ऑगस्ट मध्ये महसूल कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. साधारण चौदाशेहून अधिक कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक अडचण होत आहे. महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन महसूल कर्मचाऱ्यांनी वेतनाची मागणी केली. वित्त विभागाकडे वेतनासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली होती.
अद्याप वेतन जमा न झाल्याने कर्मचारी परेशान आहेत. कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करू नये, अशी विनंती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी संघटनेच्या प्रतिनिधींकडे केली. त्यामुळे, संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला शुक्रवार पर्यंत अल्टिमेटम दिला आहे.