अक्कलकोट : दारिद्र्य निर्मूलन योजनेंतर्गत मैंदर्गी शहरातील २५ दिव्यांगांसाठी प्रति लाभार्थी सात हजार शंभरनुसार १ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा निधी थेट बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा दीप्ती केसूर यांनी दिली.
केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी समान संधी, संरक्षण व समान सहभाग कायदा १९९५ हा १९९६ पासून लागू केला आहे. या कायद्यातील कलम ४० अन्वये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी त्या योजनेंतर्गत पाच टक्के निधी राखीव ठेवण्याबाबत शासन निर्णयाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत.
याबाबतचा खर्च करण्याकरता मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. मैंदर्गी नगर परिषद हद्दीत २५ नोंदणीकृत दिव्यांग बांधव आहेत. या सर्व दिव्यांग बांधवांना प्रत्येकी सात हजार शंभर याप्रमाणे थेट त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले. १२ जुलै २०२१ रोजी मैंदर्गी नगर परिषदेच्या सभागृहात शहरातील सर्व दिव्यांग नागरिकांचा मेळावा पार पडला. याप्रसंगी नगराध्यक्षा दीप्ती केसूर, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे उपस्थित होते. या निधीसाठी सहायक प्रकल्प अधिकारी राजेंद्र गायधनकर, लेखापाल अनिकेत सरडे यांनी परिश्रम घेतले.
----
कोरोनाकाळात आर्थिक घडी विस्कटलेल्या दिव्यांग बंधू, भगिनींना नगर परिषदेच्या आर्थिक साहाय्याचा निश्चितपणे उपयोग होईल.
- श्रीकांत लाळगे, मुख्याधिकारी, मैंदर्गी नगर परिषद
---
नगर परिषदेकडे अद्याप नोंद नसणाऱ्या शहरातील पात्र दिव्यांगांनी नगर परिषदेशी संपर्क साधून कागदपत्रे जमा करून तत्काळ नोंद करून घ्यावी.
- दीप्ती केसूर, नगराध्यक्षा, मैंदर्गी नगर परिषद