सोलापूर: विठ्ठलाची पंढरी आता सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीखाली येणार असून त्यासाठी १६ कोटींंचा निधी खर्च होत आहे. तीन प्रकारचे २५० कॅमेरे व स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारला जाणार असून याचे संपूर्ण नियंत्रण जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे राहणार आहे. अलीकडे देशातील व राज्यातील देवालये अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे वारंवार सांगितले जाते. याशिवाय अन्य कारणामुळेही यात्रा व अन्य कालावधीत काही गडबड होण्याची शक्यता आहे. असा प्रकार झाल्यास करणारे शोधणे काही वेळा अडचणीचे होते. यामुळे मुंबई, पुणे व अन्य शहरात महत्त्वाच्या ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याच धर्तीवर पंढरपूर शहरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतलेल्या बैठकीला देहू आळंदी विकास आराखड्याचे समन्वयक मोहन साखळकर व अन्य उपस्थित होते.
-------------------------------
शिवाजी चौकात असणार नियंत्रण कक्ष
पंढरपूर शहरातील खादी ग्रामोद्योगच्या जागेवर कॅमेराच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार असून २५० कॅमेराद्वारे शहरात कोठे काय सुरू आहे हे या ठिकाणच्या नियंत्रण कक्षातून पाहता येणार आहे. प्रत्येक कॅमेराला स्वतंत्र खांंब असून त्यावर ठिकाणाचे नाव असणार आहे. नियंत्रण कक्षात प्रत्येक कॅमेराचे ठिकाण येणार असल्याने ज्या कॅमेरामध्ये गडबड दिसेल तेथे पोलीस पोहोचण्यास सोपे जाणार आहे.
--------------------------
असे होणार काम
सीसीटीव्ही कॅमेरासाठी १६ कोटींचा खर्च तीन प्रकारच्या कॅमेरासाठी स्वतंत्र खांब, स्वतंत्र केबल, पॉवर बॅकही स्वतंत्र राहणार यात्रा कालावधीत गर्दी होणार्या ठिकाणी बसणार १३० कॅमेरे सध्या सीसीटीव्ही कॅमेराची टेंडर प्रक्रिया सुरू असून महिनाभरात ती पूर्ण होईल कामाला सुरुवात झाल्यानंतर सहा महिन्यात काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. निविदा घेणार्या कंपनीकडे संपूर्ण पाच वर्षे देखभाल राहणार आहे
-------------------------------------
गर्दीच्या ठिकाणी बसविणार कॅमेरे
तीन प्रकारचे हे कॅमेरे प्रदक्षिणा मार्ग, गावठाण परिसर, मंदिराच्या आतील भागात बसविले जाणार आहेत. पीटीझेड प्रकारचे ८०, फिक्स कॅमेरे १२० तसेच डुल (गोल) कॅमेरे ५० बसविले जाणार आहेत. आषाढी, कार्तिकी व अन्य एकादशीदिवशी गर्दी होणार्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे.
-------------------------------
सुरक्षिततेसाठी कॅमेरे बसविले जाणार आहेत. यामुळे पोलीस खात्याला चांगलीच मदत होणार आहे. सध्या निविदा प्रक्रिया सुरू असून महिनाभरात काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. -डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी