६ मे रोजी सायं. ७ च्या सुमारास वादळी वाऱ्यात महावितरण कंपनीच्या कटफळ उपकेंद्राला जोडणाऱ्या ३३ के.व्ही. वाहिनीचे तब्बल १० लोखंडी खांब (पोल) वाकून पिरगळले तर काही ठिकाणीचे कोसळले होते. त्यामुळे कटफळ उपकेंद्रासह इटकी, खवासपूर अंतर्गत गावांसह वाड्या-वस्त्यावरील वीजपुरवठा खंडित झाला होता. शुक्रवारी सकाळी ९ वाजता नवीन पोल उभारणीसाठी कामाला सुरुवात झाली. महावितरणचे २५ कर्मचारी व ठेकेदार कामगार १५ अशा ४० जणांनी वाकलेले पोल काढून नवीन पोल उभे करून तारा ओढण्यास सुरुवात केली.
यावेळी अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता संजय गवळी, उपकार्यकारी अभियंता आनंदा पवार हे कामाच्या ठिकाणी तळ ठोकून मार्गदर्शन करत होते. ज्या भागात पोल वाकले होते तो भाग माळरान असून जमीन मुरमाड असल्याने यंत्राच्या मदतीने खड्डे खोदून तारा ओढण्याचे आव्हान असताना सदरचे काम दिवस-रात्र शनिवारी पहाटे ४:३० पर्यंत तब्बल १९ तास चालले. त्यानंतर सर्वांना कटफळ उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले.
अन् सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलले
वादळी वाऱ्यात पडलेले १० लोखंडी खांब उभे करणे व वाहिन्या जोडण्याचे आव्हान होते. लाॅकडाऊनमुळे चहापाणी व जेवणाची सोय होऊ शकली नाही. अशाप्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तळ ठोकून फास्ट फूड घेऊन मार्गदर्शन केले. जनमित्रांच्या अथक परिश्रमानंतर खंडित वीजपुरवठा पूर्ववत होताच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलल्याचा अविस्मरणीय प्रसंग उपकार्यकारी अभियंता आनंदा पवार यांनी सांगितला.
फोटो ओळ ::::::::::::::::::::
वादळी वाऱ्यात पडलेले विजेचे लोखंडी खांब उभे करताना महावितरण कंपनीचे कर्मचारी व ठेकेदारांचे कामगार.