उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी हा मुद्देमाल फिर्यादींना परत केला. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी फिर्यादींचा जप्त केलेला मुद्देमाल परत करण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना दिली होती. त्यानुसार करमाळा उपविभागात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींकडून हस्तगत केलेला व इतर पोलीस ठाण्यात जमा केलेला मुद्देमाल फिर्यादींना परत केला जात आहे.
करमाळा पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्डवर असलेल्या २३ गुन्ह्यातील सुमारे ३ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यामध्ये २० मोटारसायकली, एक कार, एक मोबाइल, एक मालट्रक याचा समावेश आहे.
कुर्डवाडी पोलीस ठाण्यातील २३ गुन्ह्यातील ३ लाख १७ हजारांचा मुद्देमाल परत केला. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने, चार मोबाइल फोन, तीन मोटारसायकली, एक मालट्रक व ५९ हजार १४० रुपये रोख रक्कम या मुद्देमालाचा समावेश आहे. तर टेंभुर्णी पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील १२ गुन्ह्यातील १ लाख ६,६७५ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत देण्यात आला. यामध्ये सोन्याचे तीन म्हणी, मंगळसूत्र, फुले, बदाम, चांदीचे पैंजण, दोन मोटारसायकली व ५६ हजार ९८५ रोख रक्कम असा असा मुद्देमाल परत देण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी दिली.
करमाळा पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस निरीक्षक कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मुद्देमाल परत करण्यात आला तर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. हिरे यांच्या हस्ते फिर्यादी ना मुद्देमाल परत करण्यात आला.
----