सोलापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोमवार, ८ नाेव्हेंबर रोजी पंढरपूर दौऱ्यावर आहेत. या दिवशी ते पालखी मार्गाच्या कामाचे भूमीपूजन करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंव्दारे जनतेशी संवाद साधणार आहेत.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पंढरपूर ते आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि पंढरपूर ते देहू संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम सुरू कआहे. या कामाचे भूमीपूजन आता नितीन गडकरी करणार आहेत. गडकरी सोमवारी दुपारी १२ वाजता पंढरपुरात दाखल होतील. प्रथम ते विठ्ठल आणि रुक्मिणीचे दर्शन घेतील. पंतनगर येथे गडकरींच्या उपस्थितीत भाजप नेत्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी २ वाजता रेल्वे मैदानावर भूमीपूजनाचा कार्यक्रम होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंव्दारे जनतेशी संवाद साधतील. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमाराला गडकरी नागपूरकडे रवाना होतील.