सोलापूर: केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा दि. २६ व २७ मे रोजी माढा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून, या दोन दिवसांत ते तालुक्यातील विविध गावांना भेट देणार आहेत. या दोन दिवसांत त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम होणार असल्याची माहिती भाजपचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांनी दिली.
''लोकसभा प्रवास योजना अभियान'' उपक्रमानिमित्त त्यांचा हा दौरा असून, २६ मे रोजी दुपारी तीन वाजता त्यांचे कुर्डूवाडी येथे आगमन होणार असून, यावेळी ते कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉपला भेट देणार आहेत. त्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक, सायंकाळी ५.३० वाजता पडसाळी (ता. माढा) येथे त्यांच्या हस्ते केंद्रीय योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या जलजीवनच्या कामाचे भूमिपूजन, बावी तालुका माढा येथे रेशन दुकानास भेट, सायंकाळी सात वाजता टेंभुर्णी येथील अतिथी हॉटेल येथे लोकसभा कोअर कमिटीची बैठक, दि. २७ मे रोजी सकाळी ९ वाजता टेंभुर्णी येथील कृष्णा जेनेरिक मेडिकलला भेट, १० वाजता पुष्पक मंगल कार्यालय करमाळा रोड येथे केंद्रीय योजनेमधील लाभार्थी मेळावा, माढा तालुक्यातील बूथ प्रमुख व शक्ती केंद्रप्रमुख यांची आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर अरण (ता. माढा) येथे श्री संत सावता माळी तीर्थक्षेत्रास भेट देऊन त्या ठिकाणी धनुर्विद्येतील राष्ट्रीय खेळाडूंसमवेत बैठक, मोडनिंब (ता. माढा) येथे उपेक्षित कुटुंबाला भेट देऊन नव मतदारांची बैठक घेणार असल्याचेही योगेश बोबडे यांनी सांगितले.