सोलापूर : सोलापूरवस्त्रोद्योग क्षेत्रात जगप्रसिद्ध असून सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच सोलापुरातील टेक्सटाइल व गारमेंट उद्योगास उभारी देण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योमंत्री पियूष गोयल येत्या ऑक्टोबर महिन्यात सोलापूर दौरा करणार असल्याची माहिती खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली. संसदीय अधिवेशन काळात संसदेत खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी भेट घेतली. यावेळी महेंद्र जैन, उद्योग व्यापार आघाडीचे श्रीनिवास दायमा उपस्थित होते.
या भेटीवेळी खा. डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोलापुरातील हॅण्डलूम, पॉवरलुम, गारमेंट क्षेत्रातील चढ, उतार व कामगारांच्या समस्या संबंधित केंद्रीय वस्त्रोद्योमंत्री पियूष गोयल यांना सविस्तर माहिती दिली. तसेच सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले. या एकदिवसीय दौऱ्यात सोलापुरातील वस्त्रोद्योगास भेट, उद्योजकांच्या भेटी घेणे त्यानंतर आयोजित मेळाव्यात सोलापुरातील उद्योजकांना केंद्र सरकारच्या धोरणांची, योजनांची माहितीपर व्याख्यान देणे असे स्वरूप असणार आहे. याद्वारे सोलापूरच्या वस्त्रनिर्मिती क्षेत्रास उभारी मिळेल असे खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले.
त्यांनतर केंद्रीय वस्त्रोद्योमंत्री पियूष गोयल यांनी हे निमंत्रण स्विकारून येत्या ऑक्टोबर महिन्यात सोलापूर दौरा करणार असल्याची माहिती दिली. यामुळे सोलापूरला नक्कीच उज्वल संधी मिळण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून प्रत्यक्ष केंद्रीय मंत्री सोलापुरात मार्गदर्शन करून उभारी देणार असल्याने हा दौरा नक्कीच फलदायी असणार असल्याची माहिती खा. डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात वस्त्रउद्योजकांसह पूर्वतयारी बैठक घेणार असल्याचेही खा. डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले.