पंढरपूर : पंढरीत 'अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग' या उक्तीप्रमाणे सावळ्या विठुरायाच्या मंदिरातही रंगपंचमीचा उत्सव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनीही श्री विठुरायाच्या पंढरीत रंगाची उधळण करीत आनंदत्सव साजरा झाला.पंढरीच्या सावळ्या विठूरायाने देखील रंगोत्सव साजरा केला. पंढरीचा पांडुरंग म्हणजेच श्रीहरी विठ्ठल हा साक्षात श्रीकृष्णाचा अवतार आहे.
रंगपंचमी उत्सव हा श्रीकृष्णाचा आवडता सण असल्याने पंढरपूरमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साही आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. रंगपंचमीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेला पांढरा पोशाख आणि पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले. केशरी, गुलाबी असे नैसर्गिक रंग विठुरायाला आणि रूक्मिणी मातेला लावून मंदिरात रंगपंचमीचा आनंदत्सव साजरा करण्यात आला. विठुरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर " अवघा रंग एक झाला ,रंगी रंगला श्रीरंग " या अभंगाची प्रचिती येते.
श्री विठ्ठल श्रीकृष्णाचा अवतार असल्याने रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने मंदिरात साजरा केला जातो. वसंत पंचमी ते रंगपंचमी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेवर दररोज गुलालाची उधळण होत असते. रंगपंचमीच्या शेवटच्या दिवशी मंदिराच्या डफाची पूजा करून नामदेव पायरी पासून मिरवणूक काढून मंदिर प्रदक्षिणा केली जाते.