सोलापूर : माजी नगरसेवक माशप्पा विटे यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बापूजी नगरात शोककळा पसरली. शोकाकुल वातावरणात सायंकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली. बापूजी नगर येथील नवशक्ती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अंत्ययात्रेत लेझीम खेळली. नवशक्ती तरुण मंडळाच्या शंभर कार्यकर्त्यांनी अंत्ययात्रेत तीन तास लेझीम खेळून माशप्पा विटे यांना श्रद्धांजली वाहिली.
मयत माशप्पा हे नवशक्ती तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते. लेझीम संघातील कार्यकर्त्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले. त्यामुळे नवशक्ती तरुण मंडळातील कार्यकर्ते त्यांना गुरु मानत. गुरूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी अंत्ययात्रेत लेझीम खेळली. सर्व कार्यकर्ते साश्रूनयनांनी तीन तास लेझीम खेळून गुरु माशप्पा यांना अखेरचा निरोप दिला. अंत्ययात्रेत लेझीम आणि हलगीनाद सुरू असल्याने अंतयात्रेने सर्वांचे लक्ष वेधले.
माकपच्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. सायंकाळी मोदी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी नगरसेवक माशप्पा सिद्राम विटे ( ५३, राहणार बापुजी नगर) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. सोलापूर महानगरपालिकेत ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. माकपाचा बुलंद आवाज म्हणून ते महापालिकेत परिचित होते. गुरुवारी ३ डिसेंबर रोजी माशप्पा यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी बापूजी नगरात पसरली. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्याकरिता माकपाचे हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली.