सोलापूर : विवाहानंतर प्रत्येकजण देवाचे दर्शन घ्यायला जातो. छत्रपती शिवराय हे आराध्य दैवतच असल्याने लग्नातील अक्षता डोक्यावर पडल्यानंतर कुठेही न जाता शिवस्मारक येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन विनायक व संगीता यांनी सुखी संसाराची सुरुवात केली.
विनायक दुदगी व संगीता बाबा यांचा विवाह शिवराज्याभिषेक दिवशी म्हणजेच सहा जून रोजी झाला. आशा नगर येथील स्वगृही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात आले. लग्नामध्ये आशीर्वादरुपी अक्षता पडल्यानंतर विनायक व संगीता यांनी विलंब न करता शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.
विनायक दुदगी यांना गड भ्रमंती करण्याची आवड आहे. शाळा व महाविद्यालयातील मुलांना याची गोडी लागावी यासाठी ते जागृती करतात. गडभ्रमंतीच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास सर्वांना कळावा यासाठी ते प्रयत्न करतात. आपल्या विवाहातही त्यांनी याचा विचार करुन शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधला.
राज्याभिषेकदिनापेक्षा चांगला मुहूर्त कुठलाच नाही
विवाह करण्याचे ठरल्यानंतर मुद्दामहून शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच सहा जून रोजीचा मुहूर्त ठरवण्यात आला. इतर मुहूर्त असतानाही शिवराज्याभिषेक दिनापेक्षा आणखी दुसरा कुठला चांगला मुहूर्त असू शकतो या विचाराने सहा जून तारीख निवडण्यात आली. विवाहानंतर लगेच शिवस्मारक येथे जाऊन दर्शन घेतले. दुदगी आणि बाबा या दोन्ही कुटुंबीयांनाही याचा आनंद झाला.
नेहमी लग्नानंतर देवाचे दर्शन घेतात. सध्या लॉकडाऊन असल्याने देवदर्शन करता येणे शक्य नाही. त्यामुळे महाराजांचे दर्शन घेऊन संसाराची सुरुवात करण्याचे ठरले. ही माझी संकल्पना सर्वांनाच आवडली. त्यानुसार आम्ही वर-वधूंनी नियम पाळून शिवरायांचे दर्शन घेतले.
- विनायक दुदगी, वर