सोलापूर : खराब रस्ते, खड्ड्यात गेलेली ड्रेनेजची झाकणे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य, खराब होणारी स्मार्ट सिटी ची कामे यामुळे सोलापूर शहरातील नागरिक वैतागले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी महापालिकेच्या गेटवर सोलापूर शहरातील विविध निकृष्ट कामांचे फोटो झळकवित, शोभेचे दारू काम करत गाजरांचा केक कापून स्मार्ट सिटीच्या निकृष्ट कामांचा निषेध करण्यात आला.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्मार्ट सिटी चे काम जनतेच्या डोक्याला झेंडू बाम.. सोलापूर शहर उद्ध्वस्त करणाऱ्या डेंगळे पाटलांचा निषेध असो.. अशा घोषणा देत अभिनव पद्धतीने निषेध केला. याप्रसंगी महेश धाराशिवकर यांनी हजारो कोटींच्या कामात जो भ्रष्टाचार झालेला आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी केली. प्रताप चव्हाण यांनी मंजुरी न घेताच बिले काढल्याचा आरोप केला व या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.
याप्रसंगी शिवसेना शहर उपप्रमुख बाळासाहेब गायकवाड, बंटी बेळमकर, सुरेश जगताप, सोलापूर विद्यापीठ अधिकारी लहू गायकवाड, उत्कर्ष जमदाडे, उज्वल दीक्षित, सतीश माने, विजय मोटे, विशाल सोरेगावकर, रमेश पुकाळे, जयप्रकाश मंठाळकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.