सोलापूर : ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, त्या डिन्प्रो विद्यापीठाने, तसेच ज्यांच्या मार्फत शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेले अशा एजन्सीने हात झटकल्यानंतर सोलापुरातील आठ विद्यार्थ्यांना युक्रेन आणि रशियाच्या युद्धाने आणखी भयभीत करून सोडले. सोलापूरची मुले आपापसात चर्चा करून, तसेच तेथील स्थानिक मुलांच्या सहकार्याने एका खासगी बसने हंगेरीच्या बाॅर्डरकडे निघाली असून, निघण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पालकांना फोन करून प्रवासाची माहिती दिली. प्रवास धोकादायक असून, पंधराशे किमीच्या प्रवासानंतर बोलू. तोपर्यंत फोन बंद राहील. विद्यार्थ्यांच्या संवादानंतर साेलापुरातील पालकांचा जीव मुठीत राहिला आहे.
सोलापुरातील आठ विद्यार्थी हे एमबीबीएसचे असून, सर्वजण ग्रामीण भागातील आहेत. बससाठी प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा खर्च आलेला आहे. काही मुलांकडे पैसे नव्हते. काॅलेजमधील सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मदत केली आहे. पालकांनी रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. काहींचा संपर्क झाला, तर काहींचा संपर्कच झालेला नाही.
त्यामुळे पालक चिंतित आहेत. रात्री उशिरा हंगेरीच्या बाॅर्डरवर सुरक्षित पोहोचल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे; परंतु पालकांकडून रात्री उशिरापर्यंत अधिकृत माहिती मिळालेली नाही. तेथून त्यांचा भारत प्रवास कसा राहील, याबाबत पालकांना काहीच माहिती नाही. त्यासाठी विद्यार्थी तेथील प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती अभिजित चव्हाण यांचे वडील, काका यांनी ‘लोकमत’ला दिली.
............................
पालक धास्तावलेले
युक्रेनची राजधानी कीव्ह येथून साडेचारशे किमीच्या अंतरावर डिन्प्रो शहरात डिन्प्रो वैद्यकीय महाविद्यालय आहे. डिन्प्रो शहरावरदेखील युद्धाचे सावट असल्याने येथील विद्यार्थ्यांनी तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला. यात सोलापुरातील आठ जणांचा समावेश आहे. प्राजक्ता घाडगे यांचे वडील शिवाजी घाडगे यांनी सांगितले की, माझ्या मुलीसोबत मंगळवारी सकाळी संवाद साधला. मुलगी म्हणाली, एजन्सीने सुरुवातीला त्यांना हंगेरीकडे जायची परवानगी दिली. नंतर त्यांनी जबाबदारी घेतलेली नाही. जायचे असेल तर स्वत:च्या रिस्कवर जा, असे एजन्सीने सांगितले. त्यामुळे मुलगी काहीशी घाबरलेली होती. तेथील मुलांच्या सोबत प्राजक्ता हंगेरीकडे निघाली असून, भारतात दाखल होईपर्यंत आम्ही चिंतित आहोत. आम्ही खूप घाबरलेलो आहोत.
भारताकडे निघालेले विद्यार्थी
- अभिजित चव्हाण, मंगळवेढा
- प्रथमेश माने, मंगळवेढा
- निरंजन गल्लुबरमे, पंढरपूर
- सुजाता भोसले, मंगळवेढा
- विश्वास बोन्जे, पंढरपूर
- वैष्णव कोळी, पंढरपूर
- आकाश पवार, मोहोळ
- प्राजक्ता घाडगे, पंढरपूर