सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा आज (गुरुवारी) वर्धापन दिन. विद्यापीठाची स्थापना होऊन पंधरा वर्षे पूर्ण झाली. मागील काही वर्षांत विद्यार्थी केंद्रित स्किल इंडिया अंतर्गत कौशल्याभिमुख अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. यामुळे विद्यापीठातून कौशल्याभिमुख विद्यार्थी तयार होत आहेत. यासोबतच पेपरलेस कारभार, कॅशलेस व्यवहार तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आपले वेगळेपण निर्माण केले आहे, असे असले तरी विद्यापीठासमोर अनेक आव्हानेही आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व व शिक्षणप्रेमींची वाढती मागणी पाहून तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी २००४ मध्ये केवळ एका जिल्ह्यासाठी सोलापूर विद्यापीठाची स्थापना केली. यावेळी पहिले कुलगुरू म्हणून डॉ. इरेश स्वामी यांची निवड झाली. त्यानंतर दुसरे कुलगुरू म्हणून डॉ. बाबासाहेब बंडगर आणि तिसरे कुलगुरू म्हणून डॉ. एन. एन. मालदार यांनी जबाबदारी सांभाळली. आता गेल्या १४ महिन्यांपासून डॉ. मृणालिनी फडणवीस या कुलगुरूपदाची सूत्रे सांभाळत आहेत.
आज केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियानांतर्गत देशातील विद्यापीठांना संशोधनासाठी तसेच पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि संलग्नित १० महाविद्यालयांनाही ‘रुसा’चे अनुदान प्राप्त झाले आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.
विद्यापीठाकडून कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कृषी पर्यटन प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर सोलापूरच्या वस्त्रोद्योगाची परंपरा जोपासण्यासाठी हातमाग अभ्यासक्रम सुरू करून त्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येत आहे. सोलापूरच्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी या विद्यापीठाकडून पाच परदेशी विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे.
विद्यापीठाबाबत डिजिटल विद्यापीठ असे गौरवोद्गार काढण्यात येत असले तरी अद्यापही पूर्णपणे आॅनलाईन असेसमेंट (आॅनलाईन पद्धतीने पेपर तपासणी) केले जात नाही. परीक्षा केंद्रावर ईमेलच्या माध्यमातून त्याच दिवशी प्रश्नपत्रिका पाठविण्यात येत आहेत. यातही काही प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत. यात सुधारणा करणे आवश्यक आहे.
अशातच अभियांत्रिकी शिक्षण घेण्याबाबत विद्यार्थ्यांचा ओढा, हा अद्यापही पुण्यासारख्या शहरांकडेच आहे. काही अभ्यासक्रमांचे निकाल ४५ दिवसांनंतर लागतात, नाहीतर फक्त लेजरच्या स्वरूपात निकाल लावल्याचे घोषित केले जाते. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना गुणपत्रिका उशिरा मिळतात. विद्यापीठाचा कारभार हा स्वतंत्र इमारतीत न होता अद्यापही ग्रंथालयाच्या इमारतीत होत आहे. तसेच भाषा संकुलाला अनुदान मिळवून देणे अशी अनेक आव्हाने विद्यापीठासमोर आहेत.
विद्यापीठ दृष्टिक्षेपात- संलग्नित महाविद्यालये- ११० - विद्यार्थ्यांची संख्या- एक लाख दहा हजार- अभ्यासक्रमांची संख्या- ५५- कौशल्य विकास अभ्यासक्रम संख्या- ७०- विद्यापीठ संकुले- ७- विद्यापीठाकडील जमीन- ५१७ एकर.