आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संबंधित होटगी रोडवर करण्यात आलेल्या ‘त्या’ इमारतीच्या बांधकामाविषयीची फाईल मागविली असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी मंगळवारी काँग्रेसभवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या बेकायदा बांधकामाकडे लक्ष वेधले होते. अग्निशामक दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर त्यांनी हे निवासस्थान उभारले आहे, असा त्यांनी आरोप केला होता. या बांधकामाविषयी विचारणा केली असता, आयुक्त डॉ. ढाकणे यांनी मी बांधकाम विभागाकडून ही फाईल मागविली आहे. फाईलीचा अभ्यास करून यावर बोलणे उचित होईल असे ते म्हणाले. बांधकाम बेकायदेशीर असेल तर त्यावर कारवाई करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. याला कोणी तक्रार करण्याची गरज नाही. बेकायदा बांधकाम निदर्शनाला आल्यावर त्यावर संबंधित विभागाकडून चौकशी करून रितसर कारवाई करणे अपेक्षित आहे असे आयुक्त डॉ. ढाकणे म्हणाले. माजी आमदार दिलीप माने यांच्या आरोपानंतर मनपाच्या बांधकाम विभागाने या बांधकामाविषयी माहिती संकलित करून ठेवली आहे. ही फाईल गुरुवारी आयुक्त डॉ. ढाकणे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या काळात बेकायदा बांधकामाविरुद्ध मोहीम घेण्यात आली होती. त्या काळात या ठिकाणी बांधकाम सुरू झाले होते. त्यावेळी पार्किंगक्षेत्रात येणारी वॉचमनची केबीन मनपातर्फे पाडण्यात आली होती. त्यानंतर हे बांधकाम थांबले होते. गुडेवार यांच्या बदलीनंतर वॉचमनच्या केबीनची जागा बदलून हे बांधकाम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती कर्मचाºयांकडून देण्यात आली आहे. -----------------माजी मंत्री ढोबळे यांच्या बांधकामाची चौकशी- माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची जुळे सोलापुरात सिंधुविहार शेजारी म्हाडाच्या जागेत शिक्षण संस्था आहे. या जागेत भव्य वास्तूचे बांधकाम सुरू आहे. प्राथमिक चौकशीत कार्यालयासाठी बांधकाम परवाना घेण्यात आला व प्रत्यक्षात या जागेवर टोलेजंग इमारतीचे काम सुरू असल्याचे निदर्शनाला आले आहे. बांधकाम परवान्याप्रमाणे या इमारतीचे बांधकाम होत आहे काय, याची तपासणी करण्यात येत असल्याचे बांधकाम परवाना विभागाचे उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले. आरक्षित जागेवर बांधकाम झाल्याची शहरात अशी आठ प्रकरणे असल्याची माहिती भाजपाच्या एका नगरसेवकाने पुरविली आहे.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घराचे बेकायदा बांधकाम ?, चौकशीसाठी सोलापूरच्या महानगरपालिका आयुक्तांनी फाईल मागविली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 9:04 AM
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संबंधित होटगी रोडवर करण्यात आलेल्या ‘त्या’ इमारतीच्या बांधकामाविषयीची फाईल मागविली असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ठळक मुद्देकाँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसभवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या बेकायदा बांधकामाकडे लक्ष वेधले होतेअग्निशामक दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर त्यांनी हे निवासस्थान उभारले बांधकाम बेकायदेशीर असेल तर त्यावर कारवाई करणे ही महापालिकेची जबाबदारी