याबाबत विस्तार अधिकारी योगेश सुभाष गोटे यांनी संतोष बिरा बुरंगे (रा. बुरंगेवाडी), संतोष भारत माने (रा. आगलावेवाडी) व अविनाश ईश्वर सुरवसे (रा. जवळा, ता. सांगोला) या तीन वाहन चालकांवर भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तहसीलदारांकडे प्राप्त तक्रारी अर्जानुसार चौकशी करण्याकामी भरारी पथकाचे विस्तार अधिकारी योगेश गोटे व पोलीस कॉन्स्टेबल इमरान तांबोळी ९ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास शासकीय वाहनाने जवळा येथील बसस्थानक चौकात आले असता तीन (एमएच ४५/ एएफ ४२७५, एमएच ४५ / एएफ २७९६ व एमएच ४५ /एएफ ३१५९) वाहनांवर स्पीकर लावून ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची ऑडिओ क्लिप वाजवीत होते. यावेळी विस्तार अधिकारी गोटे यांनी चालकांकडे ऑडिओ क्लिप वाजविण्याचा परवाना आहे का, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांच्याकडे स्पीकर परवाना व वाहन वापर परवाना होता; परंतु ऑडिओ क्लिप वाजविण्याचा परवाना मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, परवान्यासाठी केलेल्या अर्जाची पोच असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर तहसीलदारांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिला होता.