कृषिभूषण ज्योतीराम गायकवाड यांनी विकसित केलेल्या शबरी बोरामुळे पडसाळी गावाचे नाव राज्यात पोहोचले होते. आता याच गावातील शेतकऱ्यांची ढबू मिरची देशभरातील बाजारपेठेत पोहोचली आहे. या अगोदर कांदा उत्पादनात पडसाळीच्या शेतकऱ्यांनी क्रांती केली होती.
उघड्या-बोडक्या माळरानाचे बागायती करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठे कष्ट उपसले आहे. यामुळे पडसाळी गावचा शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेत आहे. मात्र अपुऱ्या वीजपुरवठ्याचा मोठा अडथळा आहे. हाच प्रश्न निकालात काढण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रस्ताव पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुधाकर सिरसट, भागवत सिरसट, लहू पाटील, जगन्नाथ सिरसट, सोमनाथ दुधाळ आदी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. शेतीसाठी विजेचा प्रश्न तसेच इतर विकासकामे मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी गावाच्या प्रमुखांनी पुढाकार घेतल्याचे माजी सरपंच जितेंद्र भोसले यांनी सांगितले.
द्राक्ष, ढबू मिरची व अन्य शेती उत्पादन घेत संपूर्ण शेती बागायती झाली आहे. विजेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी वीज उपकेंद्र होणे गरजेचे आहे.
- संतोष सिरसट
----