कुर्डूवाडी येथील माढा पंचायत समितीच्या कार्यालयात अचानक गुरुवारी सकाळी अकरा वाजता येत गैरहजर असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वारंवार असणाऱ्या गैरहजेरीबद्दल अतुल खूपसे-पाटील व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांना त्यांच्या दालनात धारेवर धरले. त्यावेळी त्यांनी येथील सर्व विभागांची हजेरी पुस्तके मागवत केलेल्या तपासणीत तब्बल २३ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विनापरवाना दांडी मारल्याचे दिसून आले. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी लागलीच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत विनावेतन करण्याचे आदेश दिले. यामुळे पंचायत समितीच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली.
जो तो आपापल्या कार्यालयाकडे उशिरापर्यंत धावत पळत येत असल्याचे निदर्शनास आले. कारवाई करेपर्यंत अतुल खूपसे पाटील व कार्यकर्ते मात्र पंचायत समितीच्या आवारातच थांबून होते.
कुर्डूवाडी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीत जिल्हा परिषद अंतर्गत येणारे सर्व विभाग आहेत. गुरुवारी सकाळी खूपसे-पाटील यांच्याजवळ काही कार्यकर्त्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अचानक पंचायत समिती कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी थेट गटविकास अधिकारी डॉ. पाटील यांच्या दालनात प्रवेश करत याबाबत जाब विचारला. यावर त्यांनी सर्व विभागाचे मस्टर मागविले, तर तब्बल २३ जण कार्यालयात पोहोचले नसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
यावेळी त्यांच्यासमवेत रोहन नाईकनवरे, अमोल गरड, सुधीर लवटे, प्रकाश खूपसे, राणामहाराज वाघमारे, महेश घरबुडे, तेजस गाडे, विजय खूपसे, भैया देवडकर, गणेश यादव, सचिन घाडगे, आदी उपस्थित होते.
----
हे अधिकारी, कर्मचारी गैरहजर
गैरहजर असणाऱ्यांमध्ये कृषी अधिकारी एस. एस. पवार, ग्रामपंचायत विभागातील लिपिक योगेश गोरे, विस्तार अधिकारी भारत रेपाळ, आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक डी. डी. चव्हाण, आयसीडीएस माढा विभागातील पर्यवेक्षिका एल. एम. चव्हाण, वाय. एस. लोखंडे, एस. के. गढहिरे, आर. यु. शिंदे, शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक एस. डी. आढाव, जलसंधारण विभागातील वरिष्ठ सहायक माधुरी बुदतराव, कनिष्ठ सहायक डी. जी. वाघमारे, आयसीडीएस टेभुर्णी प्रकल्प पर्यवेक्षिका ए. एम. मगर, एल. के. पाटील, ए. ए. खटके, तर बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता पी. बी. बारंगळे, बी. व्ही. रेपाळ, एम. एस. जवळकोटे, आर. व्ही. ढेंगळे, के. एल. चव्हाण, के. एस. खटके, एन. सी. खळदकर, वाहनचालक ए. आर. लालसिंग, परिचर डी. एस. अपराजित, आदी २३ जण गैरहजर असल्याचे निदर्शनास आले.
-----
२५कुर्डूवाडी
माढा पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांच्या दालनात अतुल खूपसे-पाटील यांनी कार्यकर्त्यांना घेऊन गैरहजर असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांबाबत जाब विचारत आंदोलन केले.