दीपक दुपारगुडे सोलापूर : माढा तालुक्यात हवामानात बदल झाला आहे. राज्याबाहेर अवकाळी पावसाने मोठी हजेरी लावून वाहतूक ठप्प केली आहे. बाहेर राज्यांना जोडलेल्या महाराष्ट्रातील महामार्गांवर सध्या ढगाळ वातावरण असल्याने माढ्यातून निर्यात होणारी द्राक्षांचे घड बागेतच लटकले आहेत. खराब होण्यापूर्वीच हरियाणातील व्यापाऱ्यांनी या द्राक्षांकडे पाठ फिरवली आहे. दुसरीकडे तालुक्यातील बागायतदारात पावसाची भीती निर्माण झाली आहे तर त्याही पुढे जाऊन बेदाणा उत्पादक शेतकरी शेडअभावी धास्तावला आहे.
जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत हवामानात मोठा बदल होणार असून दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचाच आधार घेत माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्याचे षडयंत्र व्यापाऱ्यांकडून सुरू आहे.
माढा तालुक्यात सध्या उसाचा हंगाम संपला असून ज्वारी, द्राक्ष, हरभरा, गहू, आंबा अशा पिकांच्या काढणीला वेग आला आहे. परंतु लाखो रुपये खर्च करून द्राक्ष बागायतदारांनी जोपासलेल्या बागेला खूप मोठा फटका बसला आहे.
- माढा तालुक्यात दीड हजार हेक्टरवर द्राक्षांची लागवड झाली आहे.
- दरवर्षी या तालुक्यात कोट्यवधीच्या द्राक्ष हरयाणा, दिल्ली, केरळ, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात प्रामुख्याने निर्यात करतो.
- बेदाणा सांगली बाजार पेठेत जातो.
- तालुक्यात दरवर्षी २०० कोटींची उलाढाला होते. यंदा अवकाळीमुळे आर्थिक अडचणीत बागायतदार सापडतोय.