सोलापूर : अवकाळी पावसाने मंगळवारी जिल्ह्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक गावांना तडाखा बसला आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील २३०० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. जवळपास ३८०० शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका पंढरपूर तालुक्याला बसला असून जवळपास १६०० हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक गावे पावसामुळे बाधीत झाली आहेत.
जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बाधित शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते. द्राक्ष बागा, डाळिंब, केळी, आंबा, लिंबू, पपई, ज्वारी तसेच बेदाण्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. १३ एप्रिलच्या सायंकाळी साडेपाच दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारांचे नुकसान झाले. विद्युत खांब उखडले गेले. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे प्राथमिक अंदाज घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी, १४ एप्रिल रोजी कृषी अधिकारी नुकसान झालेल्या गावात जाऊन बाधित शेतकऱ्यांची संवाद साधला. नुकसानीत शेती पिकांची माहिती घेतली.
सर्वाधिक पाऊस उत्तर सोलापूर, मोहोळ तसेच दक्षिण सोलापूरमध्ये झाला आहे. पुढील दोन-तीन दिवस नुकसानीत पिकांचे माहिती घेण्याचे काम सुरू राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दोघे जखमी
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील दोन व्यक्ती जखमी झाली आहेत. तसेच बारा मोठ्या जनावरांचे खूप छान झाले असून दोन लहान जनावरे दगावली आहेत. यासोबत २२ कच्चा घरांचे नुकसान झाले आहे, सर्वाधिक नुकसान मंगळवेढा तालुक्यात झाले असून नऊ गावे बाधित झाले आहेत.